Prakash Karat on bjp rss : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अतूट नाते आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपामधून राजकारणात सक्रिय झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वर्ष संघाचे प्रचारक राहिलेले आहेत. भाजपाला निवडणूक जिंकवण्यासाठी संघाचं मोठं योगदान असतं, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला नुकतीच भेट दिली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजकारणातील अनेक महत्वांच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
तमिळनाडूतील मदुराई येथे २ ते ६ एप्रिल दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाची स्वतंत्र ताकद वाढवण्याची गरज आणि राजकीय महत्व याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीपूर्वी इंडियन एक्स्प्रेसने सीपीआय नेते प्रकाश करात यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत करात यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका, इंडिया आघाडीचे राजकीय भवितव्य, भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी संघ कशी मदत करतो? विरोधीपक्ष निवडणुकीत कुठे कमी पडतात? अशा अनेक महत्वाच्या विषयांवर सडेतोड उत्तरे दिली.
इंडिया आघाडीची टिकणार का?
आगामी काळात इंडिया आघाडीचे राजकीय भवितव्य काय? सर्व पक्ष एकजूट राहणार का? असा प्रश्न करात यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधील लोटला आहे. केंद्रातील नवीन सरकारने त्यांचे कामही सुरू केलं आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाही. या आघाडीच्या स्थापनेचा उद्देश भाजपाला लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यापासून दूर ठेवावं, असा होता. त्यांना ३०० जागांच्या आत रोखण्यात इंडिया आघाडीला यश मिळालं. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर काय करावं हे आघाडीतील घटकपक्षांना कळालं नाही”, असं करात यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा : पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी खरंच महाराष्ट्रातून असेल का? याबाबत का होतेय चर्चा?
“आमच्या पक्षाला वाटते की, सर्व धर्मनिरपेक्ष विरोधी पक्षांसाठी एका व्यापक व्यासपीठाची आवश्यकता आहे. निवडणुकीनंतर हे व्यासपीठ कसे पुढे नेता येईल यावर काम करण्याची गरज आहे. इंडिया आघाडीचा विचार फक्त राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला. राज्यातील निवडणुकांमध्ये युती करण्यास घटकपक्षांनी टाळाटाळ केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसशी युती केली नाही. परिणामी दोन्ही पक्षाला मोठा फटका बसला आणि भाजपाने २७ वर्षानंतर राजधानीत सत्तास्थापन केली”, असंही करात म्हणाले.
इंडिया आघाडीत एकजुटीचा पुढाकार कुणी घ्यावा?
इंडिया आघाडीतील एकजूट टिकून राहावी यासाठी कोणत्या पक्षाने पुढाकार घ्यायला हवा, अशा प्रश्न प्रकाश करात यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “काँग्रेस हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा घटकपक्ष आहे. त्यांच्या नेत्यांनी जर बैठक बोलावली तर घटकपक्षातील सर्वजण उपस्थित राहतील याची मला खात्री आहे, असं प्रकाश करात यांनी म्हटलं आहे.
सीपीआय काँग्रेसशी युती का करू शकत नाही?
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वारंवार सांगत आहे की, आम्ही काँग्रेसबरोबर युती करू शकत नाही. भाजपाविरोधी मतांची एकजूट करण्यासाठी युती करणं योग्य राहणार नाही का? असा प्रश्न करात यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, आमच्यासाठी, युती या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. हा केवळ निवडणूक करार किंवा जागावाटपाचा मुद्दा नाही. युती म्हणजे दोन्ही पक्षांचे विचार एक असणं. काँग्रेस आणि आमच्या पक्षात अनेक मुद्दे आणि आर्थिक धोरणांवरून मतभेद आहे. त्यामुळे त्यांची आणि आमच्या पक्षाची युती होणे शक्य नाही, असं करात यांनी स्पष्ट केलं आहे.
‘भाजपाला निवडणुकीत संघाची मदत होते’
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अनेक आंदोलनं करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यातील बऱ्याच आंदोलनांमध्ये त्यांना यशही आलं. मात्र, या आंदोलनांमुळे लोक प्रभावीत होऊन सीपीआयच्या पाठिशी का उभे राहिले नाहीत? असा प्रश्नही प्रकाश करात यांनना विचारण्यात आला. यावर बोलताना, राजकीय पक्षाच्या आणि त्यांच्या संघटनेच्या कार्याची पद्धत महत्वाची आहे, असं करात यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उदाहरणही दिलं आहे.
विरोधीपक्ष नेमके कुठे कमी पडतात?
ते म्हणाले, “आपण भाजपा, संघ आणि हिंदुत्ववादी शक्तींशी लढण्याबद्दल बोलतो. पण त्यांचा विस्तार कसा झाला आहे? अनेक पक्षांप्रमाणेच आपणही निवडणुकीच्या विविध मुद्दे उचलून धरतो. सामाजिक प्रश्न बाहेर काढतो, सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर लक्ष वेधतो. कारण, आपल्याला असं वाटतं की, या मुद्द्यांवरूनच सत्ताधाऱ्यांना पराभूत करता येऊ शकतं. परंतु, तसं अजिबात नाही. निवडणुकीची तयारी वर्षांनुवर्ष करावी लागते. संघाचे स्वयंसेवक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्य करीत असतात. निवडणुकीच्या आधी पडद्यामागून संघाचे कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करीत असतात. याचा फायदा भाजपाला निवडणुकीत होतो”.
‘भाजपाविरोधात विशेष रणनीतीची आवश्यकता’
“आपण कुठे आहोत? आपणही तेच करत आहोत का? भाजपा आणि संघाचा मुकाबला कसा करायचा यावर आपण काम करायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झाल्यास आपण श्रद्धाळू लोकांमध्ये जावं आणि त्यांना समजून सांगावं की, आपण त्यांच्या धार्मिक श्रद्धेविरुद्ध नाही तर राजकारणासाठी धार्मिक श्रद्धेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध लढत आहोत. या संदर्भात गेल्या पक्ष काँग्रेसमध्ये दिलेल्या सूचना योग्य होत्या, परंतु आम्ही त्या अंमलात आणण्यात अयशस्वी झालो, कारण ते कसे करायचे हे आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना योग्यरित्या माहीत नव्हते”, असंही करात यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : PM Modi RSS Visit : मोदींची संघ मुख्यालयाला भेट, तोंडभरुन कौतुक; यामुळे कुठले मुद्दे आले चर्चेत?
लोकसभेचा फायदा विधानसभेत का नाही झाला?
दरम्यान, १५ मार्च रोजी करात यांनी महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. कारण, आघाडीतील तिन्ही घटकपक्षांनी या निवडणुकीत एकजूट दाखवली होती. त्यामुळे भाजपाला तिथे जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुकीत उलटंच घडलं. भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या. यामागचं कारण म्हणजे, या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये एकजुटता दिसून आली नाही.”
झारखंडमध्ये भाजपाचा कशामुळे पराभव?
“झारखंडमध्ये इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली. त्यामुळे भाजपाला तिथे यश मिळवता आलं नाही. राज्यांनुसार परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलत असल्याने विरोधीपक्ष कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकले नाही. उदाहरणार्थ, झारखंडमध्ये इंडिया आघाडीनं चांगली एकजुटता दाखवली आणि ते भाजपाचा पराभव करण्यात यशस्वी झाले. या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वसामान्यांचा असा समज आहे की, भाजपाने इंडिया आघाडीला पराभूत करून राजकारणात आपले स्थान मजबूत केले आहे. परंतु, मला असं वाटतं की इंडिया आघाडी फक्त लोकसभेसाठी स्थापन करण्यात आली होती. राज्यांच्या निवडणुकांसाठी तिचा फारसा विचार करण्यात आला नव्हता”, असंही प्रकाश करात म्हणाले.