उमाकांत देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस असो की भाजप, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कायम मर्जीत राहण्याचे कसब असलेल्या आमदार प्रसाद लाड यांचा राजकीय आणि व्यावसायिक उत्कर्ष अतिशय वेगाने म्हणजे गेल्या १०-१५ वर्षात अधिक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील या नेत्यांच्या मर्जीतील नेता असलेल्या लाड यांनी भाजपमध्ये आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही विश्वास संपादन केला. लाड हे नेहमीच फडणवीस यांच्याबरोबर असतात आणि त्यांनी दिलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या व नाजूक जबाबदाऱ्याही सांभाळतात. महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये व निवडणूक काळात आमदारांच्या भेटीगाठी घेणे, पंचतारांकित हॉटेल्स किंवा अन्य राज्यांमध्ये त्यांची व्यवस्था करणे, अशी महत्त्वाची कामेही त्यांनी हाताळली आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आल्यावर अल्पावधीतच ज्येष्ठ व जुन्या नेत्यांना डावलून विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी २०१७ मध्येच मिळविलेले प्रसाद लाड हे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत राहिले आहेत.

प्रसाद लाड यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. परळमधील दहा बाय दहाच्या खोलीत लहानपण गेले. वडील माझगाव गोदीत कामगार होते. त्यांच्या वडिलांनी १९६० च्या दशकामध्ये दिवाकर रावते, सुभाष देसाई यांच्यासमवेत शिवसेना कार्यकर्ते म्हणून काम केले होते. घरची गरिबी असल्याने लाड यांनी पडेल ते काम केले. मात्र आमदारांचा रुबाब पाहून राजकारणातच पडण्याचा आणि आमदार होण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यासाठी धडपड करीत असतानाच लाड यांनी तत्कालीन आमदार बाबूराव भापसे यांच्या मुलीशी १९ व्या वर्षीच पळून जाऊन प्रेमविवाह केला. महाविद्यालयीन जीवनात राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम सुरू केले. ज्येष्ठ नेत्यांबरोबर जवळीक साधण्याचे राजकीय कसब असलेल्या लाड यांना जयंत पाटील यांच्यामुळे ३१ व्या वर्षीच सिध्दीविनायक न्यासाच्या विश्वसस्तपदी काम करण्याची संधी मिळाली, तर पुढे काही वर्षातच मंत्रीपदाचा दर्जा असलेले म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाचे अध्यक्षपद लाड यांना ४० व्या वर्षी मिळाले.

राम शिंदे – नेतृत्वाशी जवळीक ठेवणारा चेहरा

लाड यांनी शीव-कोळीवाडा मतदारसंघातून २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. पण ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत लाड यांचा पराभव झाला. या कालावधीतच ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ७ डिसेंबर २०१७ रोजी पोट निवडणूक झाली. राणे यांना महाराष्ट्रात संधी देण्यास फडणवीस व अन्य नेत्यांचा विरोध होता आणि शिवसेनेनेही राणे यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. त्यावेळी जुन्या नेत्यांना डावलून भाजपने लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांना पराभूत करून लाड जिंकून आले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केले होते.

लाड यांनी राजकीय क्षेत्रातील प्रगती ज्या वेगाने केली, तेवढाच व्यावसायिक उत्कर्षही अल्पावधीतच साधला. क्रिस्टलसह काही कंपन्यांच्या माध्यमातून सुरक्षारक्षक, साफसफाई व अन्य क्षेत्रांमध्ये त्यांनी कंत्राटे मिळविली. विमानतळ, शासकीय व निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांची कोट्यवधी रुपयांची अनेक कंत्राटे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सरकारच्या कार्यकाळातही मिळाली. सत्ता कोणाचीही असो, लाड यांचे सर्वपक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याने त्यांची शासकीय व निमशासकीय संस्थांमधील कामे सुरूच राहिली.

प्रवीण दरेकर – राजकीय वाऱ्यांची दिशा हेरणारे व्यक्तीमत्त्व

फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या लाड यांना प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता विधानपरिषदेसाठीही लाड यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असून एकापाठोपाठ एक राजकीय पायऱ्या ते चढत चालले आहेत. सर्वपक्षीय वावर असल्याने प्रसाद लाड यांना पाचव्या क्रमांकाची उमेदवारी देऊन इतर पक्षांकडून मतांची जुळवाजुळव करून निवडून येण्याचे संकेत दिले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad lad bjp candidate for mlc election in maharashtra politics print politics news pmw