काँग्रेसची कन्याकुमारीतून सुरु झालेली ‘भारत जोडो’ यात्रा हरयाणात पोहचली आहे. शनिवारी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही यात्रा घरौंदा येथून सुरु झाली. १० जानेवारीला ‘भारत जोडो’ यात्रा पंजाबात प्रवेश करणार आहे. अशातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरून राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे.
प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जनसुराज्य अभियानाअंतर्गत ‘पदयात्रा’ काढली आहे. मोतिहारी येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेसच्या आणि त्यांच्या यात्रेची तुलना केली. त्यावर प्रशांत किशोर म्हणाले, “राहुल गांधी मोठी माणसं आहेत. माझ्या यात्रेची त्यांच्याबरोबर तुलना होऊ शकत नाही. राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर यात्रा काढत आहेत.”
हेही वाचा : बिहारमध्ये सुरू, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना होणार का?
“माझी यात्रा समाजातील प्रश्न समजून घेण्यासाठी आहे. यातून जनतेला समाधानही मिळालं पाहिजे. रोडवरती चालून मला कोणतही ऑलम्पिक रेकॉर्ड बनवायचं नाही आहे. अथवा मी किती तंदरुस्त आहे, हे सुद्धा दाखवायचं नाही आहे. जनतेचं प्रश्न समजून घेण्यासाठी माझी यात्रा असून, राहुल गांधींशी कोणतीही तुलना करायची नाही,” असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.