बिहारच्या राजकारणात आपली ताकद आजमावू पाहणारे राजकीय विश्लेषणकार प्रशांत किशोर हे आता जातीनिहाय जनगणनेवरून होणाऱ्या राजकारणात उतरले आहेत. जातीनिहाय जनगणना करणं म्हणजे फक्त जातीयवाद वाढवणं असं त्यांनी म्हटलं आहे. दुसरा तिसरा याचा उद्देश असूच शकत नाही असंही पीके म्हणाले आहेत. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्यावर राजदने कडाडून टीका केली आहे.
मी जातपात मानत नाही असं म्हणणाऱ्या प्रशांत किशोर हे जातीने ब्राह्मण आहेत. त्यांनी राजदवरही टीकेचे बाण चालवले आहेत. राजदची जेव्हा बिहारमध्ये सत्ता होती तेव्हा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सारणची घटना कशी घडली? त्याकडेही प्रशांत किशोर यांनी लक्ष वेधलं. या घटनेत एका ओबीसी यादव नेत्यावर दोन राजपूत युवकांना बेदम मारहाण करून ठार केल्याचा आरोप आहे. मात्र या घटनेला कुठलाही जातीय अँगल देण्यात आला नव्हता असंही प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांच्या टीकेवर राजदचा पलटवार
प्रशांत किशोर यांच्या या टीकेवर राजदने टीका केली आहे. माधेपुराचे आमदार आणि शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी कुठलंही नाव न घेता प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की आम्ही ते एकलव्य आहोत जे स्वतःचा अंगठा कापत नाही तर वेळ आल्यावर दुसऱ्याचा अंगठा कापतो.
यानंतर प्रशांत किशोर यांनी जनसुराज मोहिमेच्या अंतर्गत पत्रकारांशी बोलत असताना हा प्रश्न विचारला की जातीनिहाय जनगणना या सरकारला का करायची आहे? अनुसुचित जाती, जमाती आणि मुस्लिम यांची गणना तर सुरूवातीपासून केली जाते आहे असंही ते म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्याबाबतही एक वक्तव्य केलं होतं.
प्रशांत किशोर असं म्हणाले होते की राजद, जदयू आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीचं सरकार आलं कारण त्यांना ओबीसी, अतिमागासवर्गी आणि मुस्लिम मतं मिळाली आहेत. त्यांनी आधीच नितीश कुमार यांना मतं दिली होती. मात्र आता जातीनिहाय गणना होणं हे जातीयवादाला प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे असंही ते म्हणाले.