Prashant Kishor Prediction on Nitish Kumar: निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज पक्षाच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरलेले प्रशांत किशोर हे एकेकाळी नितीश कुमार यांचे जवळचे सहकारी होते. जनता दल (संयुक्त) पक्षाचे (जेडीयू) प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या राजकीय उड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मागच्या दहा वर्षात भाजपा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी त्यांनी दोन वेळा आघाडी करून वारंवार मुख्यमंत्रीपद मिळवलेले आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पण या निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तविले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, यंदाची निवडणूक नितीश कुमार भाजपाबरोबर लढवतील. पण निवडणुकीनंतर ते कोणत्या पक्षासी संधान बांधतील, हे सांगता येत नाही. असे असले तरी त्यांना यावेळी मुख्यमंत्रीपद मिळवणे अवघड जाईल.

तर मी राजकारण सोडून देईन

प्रशांत किशोर यांची जेडीयूमधून २०२० साली हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते सातत्याने नितीश कुमार यांच्याविरोधात टिकास्र सोडत आले आहेत. नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार वगळून कुणीही मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, जर मी चुकीचा ठरलो, तर मी राजकारण सोडून देईन”, असे प्रशांत किशोर यांनी चंपारण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान देतो की, त्यांनी नितीश कुमार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देणार असल्याचे जाहिर करावे. जर भाजपाने अशी घोषणा केली तर त्यांना बिहारमध्ये आमदार निवडून आणणे अवघड होईल”, असेही प्रशांत किशोर यावेळी म्हणाले. नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली असल्यामुळे एनडीएकडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास भाजपाही मागेपुढे पाहत आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर भाजपा मुख्यमंत्री पद देत नाही, हे पाहून नितीश कुमार कदाचित एनडीएतून बाहेर पडू शकतात. पण जेडीयूच्या जागा इतक्या कमी होणार आहेत की, त्यांनी कोणत्याही आघाडीत प्रवेश केला तरी त्यांना राज्याचे प्रमुख पद मिळणार नाही.

मोदींच्या पाया पडून नितीश कुमारांनी चूक केली

प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्ला चढविताना त्यांनी बिहारचा अवमान केल्याचे सांगितले. “मागच्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना नितीश कुमार यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय धरण्याची कृती केली होती. हे करून त्यांनी बिहारचा अवमान केला. जर त्यांना मोदींबद्दल एवढाच आदर असेल तर त्यांनी खासगीत त्यांचे पाय धरावेत. फक्त खुर्चीच्या मोहासाठी नितीश कुमार मखलाशी करत आहेत. याउलट ते बिहारमध्ये मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या साखर उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रातील एनडीए सरकारचा वापर का करून घेत नाहीत?”, असाही सवाल प्रशांत किशोर यांनी उपस्थित केला.

नितीश कुमार यांचे मानसिक आरोग्य ढासळले

प्रशांत किशोर यांनी मध्यंतरी नितीश कुमार यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केले होते. “नितीश कुमार हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकले आहेत. फक्त मीच नाही तर दिवंगत नेते सुशील कुमार मोदी यांनीही त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत विधान केले होते. नितीश कुमार यांनी हातात कागद न घेता त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे बोलून दाखवावीत, असे आव्हान मी त्यांना यापूर्वी दिले आहे. ते दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय त्या जिल्ह्याचे नावही सांगू शकत नाहीत. नितीश कुमार यांच्यासारखा नेता बिहारचा मुख्यमंत्री आहे, हेच राज्याचे मोठे दुर्दैव आहे”, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली होती.

Story img Loader