नांदेड : विधानसभा निवडणुकीदरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यांत रातोरात पक्षांतरे होत असताना नांदेडमध्ये भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधून घ्यावे लागले आहे. साडेतीन दशकांच्या राजकीय जीवनातील चिखलीकर यांचे हे पाचवे पक्षांतर होय. रात्रभर प्रवास करून त्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई गाठल्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नवा पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारीसाठी पक्षाचा ‘ए-बी अर्ज’ही प्राप्त झाला. पुत्र प्रवीण पाटील तसेच जीवन पाटील घोगरे, वसंत सुगावे प्रभृती त्यांच्यासमवेत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून चिखलीकर यांनी लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. उमेदवारीबाबत त्यांना भाजपातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच आश्वस्त केले होते. त्यानुसार चिखलीकर यांनी गुरुवारी आपला अर्जही दाखल केला होता; पण महायुतीच्या जागा वाटपात लोहा मतदारसंघावर पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने आपला दावा लाऊन धरल्यानंतर युतीतील या पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याचा पर्याय स्वीकारून चिखलीकर यांनी भाजपातील सुमारे सहा वर्षांचा प्रभावशाली प्रवास थांबवला.

हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2019 : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ तत्कालीन मंत्र्यांचा झाला होता पराभव; कशा झाल्या होत्या लढती?

काँग्रेसच्या माध्यमातून नव्वदच्या दशकात राजकीय पदार्पण करणार्‍या चिखलीकरांवर गेल्या दोन दशकांत ‘पक्षबदलू’ असा शिक्काच बसला असून त्यांत आता आणखी एका पक्षांतराची नोंद झाली. २०१९ पूर्वी ते शिवसेनेचे आमदार असताना फडणवीस यांनी त्यांना भाजपात घेत नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली. निवडणुकीत त्यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांचे कौतुक केले होते.

भाजपा खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातील पक्षसंघटनेत चिखलीकर यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले. फडणवीस यांनी त्यांना वेळोवेळी बळ दिले. आठ महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर हे दोन नेते एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी चिखलीकरांची उमेदवारी मान्य केली, पण पराभव झाल्यानंतर चिखलीकर व चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाला. आता लोह्याच्या उमेदवारीसाठी चिखलीकर यांना भाजपा सोडून ‘राष्ट्रवादी’त प्रवेश घ्यावा लागल्याने स्थानिक भाजपात चव्हाण यांना तोलामोलाचा स्पर्धक राहिलेला नाही, असे बोलले जात आहे.

हेही वाचा – Big Fights in Maharashtra Election 2019 : २०१९ मधल्या बिग फाईट्स कुठल्या होत्या? कुणी उधळला विजयाचा गुलाल? कोण ठरलं जाएंट किलर?

भाजपात असताना खा. चिखलीकर यांचा अजित पवार यांच्याशी उत्तम संवाद-संपर्क होता. आता चिखलीकर व त्यांच्या समर्थकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात प्रभावशाली नेता मिळाला असून पक्षप्रवेशानंतर प्रतापराव, आता जिल्हा सांभाळा अशा शब्दांत पवार यांनी त्यांच्यावर पुढची जबाबदारी सोपविली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratap chikhalikar fifth time party change join ajit pawar ncp for loha constituency print politics news ssb