बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा विक्रम स्थापन करणारे प्रतापराव जाधव यांची राजकीय कारकीर्द म्हणजे शून्यातून मोठा राजकीय नेता अशी आहे. अडत दुकानदार, सामान्य शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्था , आमदार , मंत्री ते खासदार, आणि आता केंद्रीयमंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहिला आहे.
मेहकर तालुक्यातील मादणी या खेड्यात आणि सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परिस्थिती बिकट असल्याने मेहकर बाजार समितीत अडतचा व्यवसाय सुरू केला. मात्र सामाजिक ,राजकीय क्षेत्राचे त्यांना त्याकाळातही आकर्षण होते. नव्वदीच्या दशकात त्यांनी तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे काम सुरू केले. १९८९ मध्ये बुलढाण्यात सेनेचा उदय होण्याचा तो काळ होता. त्याकाळात १४ फेब्रुवारी १९८९ रोजी मेहकरात पार पडलेली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्यामुळे मेहकर व बुलढाणा जिल्ह्यात सेनेचे भगवे वादळ तयार झाले. सन १९८९ मध्ये
मार्च १९९० मध्ये दिलीप रहाटे यांचे अकाली निधन झाल्यावर सेनेची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. बुलढाणा, जलंब (जळगाव) मध्ये सेनेचे आमदार झाले मात्र पहिल्याच लढतीत प्रताप जाधव यांचा मेहकर मतदार संघात पराभव झाला. मात्र त्याने हिंमत न हारता त्यांनी जिद्दीने काम सुरू ठेवले. त्यांनी मेहकर अर्बन बँकेच्या निवडणुकीत विजय मिळविला, त्यापाठोपाठ १९९२ मध्ये देऊळगाव माळी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला. त्यानंतर मेहकर बाजार समितीचे सभापती पद त्यांना मिळाले. जाधव यांनी १९९५ मध्ये मोठी राजकीय मजल मारली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या लढतीत विजय मिळवून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९७ मध्ये युती सरकार मध्ये क्रीडा राज्यमंत्री अन १९९८ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री झाले. नंतर १९९९ आणि २००४ च्या विधानसभेत ते मेहकर मधून विजयी झाले. आमदारकीची त्यांनी हॅट ट्रिक साधली.
हेही वाचा…पुण्यातील मोहोळ राजकारणाच्या आखाड्यातीलही यशस्वी ‘पैलवान’
दरम्यान २००९ मध्ये मेहकर मतदारसंघ राखीव झाला अन बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाला.यामुळे त्यांनी २००९ मध्ये बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढली. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे सारख्या मोठ्या नेत्याला पराभूत करीत ते ‘जायंट किलर ‘ ठरले. यानंतर २०१४ आणि २०१९ ची लोकसभेची लढत जिंकत विजयची हॅट्ट्रिक साधली. दिवंगत काँग्रेस नेते शिवराम राणे यांच्या सलग तीन विजयच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी साधली. २०२४ च्या लढतीत बाजी मारीत त्यांनी विजयाचा चौकार लगावत आपलाच विक्रम मोडीत काढला. मोदी-३ सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.