अकोला : विधान परिषदेचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदारांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील पाच माजी आमदारांनी वेगवेगळ्या पक्षाकडून तयारी सुरू केली. त्यापैकी एकाला वंचितने बाळापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. उर्वरित चार जणांच्या उमेदवारीचा काय निर्णय होतो? हे राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सर्व प्रमुख पक्षांकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. यात विधान परिषदेच्या माजी आमदारांचाही समावेश आहे. अकोट मतदारसंघातून तीन माजी आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली. अकोट मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारीसाठी पक्षांतर्गतच तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. माजी आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी अकोटमधून तयारी सुरू केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग १२ वर्षे विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार वसंतराव खोटरे हे देखील भाजपकडून अकोट मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक आहेत. खोटरे यांना राजकीय वारसा असून ते मतदारसंघातील रहिवासी देखील आहेत. मराठा समाजातून येणाऱ्या खोटरे यांची शिक्षण व सहकार क्षेत्रावर पकड आहे. अकोट मतदारसंघात उमेदवार बदलण्याचा विचार असल्यास माझा विचार व्हावा, असे पत्र त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिले.

हेही वाचा – निवडणूक काळात चक्राकार गतीने फिरणारे जोरगेवार!

महायुतीमध्ये अकोटच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केला. माजी आमदार तथा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया हे लढण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातील पाचपैकी किमान एक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्याची मागणी होत आहे. त्यामध्ये बाळापूर किंवा अकोट मतदारसंघाची चर्चा आहे. जो मतदारसंघ सुटेल तेथून लढण्याची बाजोरिया यांची तयारी आहे. बाळापूरमधून माजी आमदार नातिकोद्दिन खतीब यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. माजी आमदार बबनराव चौधरी काँग्रेसकडून अकोला पश्चिममधून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

“अकोट मतदारसंघातून लढण्यासाठी तयारी सुरू आहे. पक्षाने संधी दिल्यास निश्चित प्रभावीपणे निवडणूक लढणार आहे. ” – डॉ. रणजीत पाटील, माजी राज्यमंत्री, अकोला.

हेही वाचा – माजी खासदार नवनीत राणा राज्‍यसभेवर जाणार?

“२०१९ मध्ये पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, तेव्हा संधी मिळाली नाही. आता उमेदवार बदलण्याचा विचार झाल्यास माझा विचार व्हावा, असे वरिष्ठांना कळवले आहे. ” – वसंतराव खोटरे, माजी आमदार, शिक्षक मतदारसंघ.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation of five former mla of the vidhan parishad from akola for the legislative assembly preparations started from different parties print politics news ssb