लातूर- लातूर लोकसभा मतदारसंघात व्यावसायाने नेत्र रोग तज्ज्ञ असणाऱ्या शिवाजी काळगे यांना उमेदवारी देताना काँग्रेसनेही ‘लिंगायत’ मतदार डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
डॉ. शिवाजी काळगे हे माला जंगम या अनुसूचित जातीतील आहेत. जंगम आणि लिंगायत या जातीमध्ये असणारे सूत्र लागू पडेल व वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला तर भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांची दमछाक व्हावी असे काँग्रेसनेही प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. लातूर हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदारसंघ असल्याने उमेदवार वेगळे आणि निवडणुकीतील नेते वेगळे, असे चित्र असते. त्यामुळे डॉ. काळगे यांना निवडून आणण्यासाठी अमित देशमुख किती जोर लावणार यावर लातूर लोकसभेचे चित्र अवलंबून असणार आहे.
हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग
काँग्रेस पक्षाच्या वतीने राजकारणात नवख्या असणाऱ्या डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. डॉ. काळगे हे लातूर शहरात १९९७ पासून नेत्र शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा ते त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील हे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य स्तरावरील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. डॉ. काळगे वैद्यकीय क्षेत्रात अतिशय सक्रिय. महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेचे राज्याचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. या संघटनेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष पदाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीचे ते संस्थापक सदस्य आहेत.
अनेक नेत्र शिबिरातून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मराठवाडास्तरीय दोन नेत्र परिषदाचे ते संयोजकही होते. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हाभरात शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्यातही त्यांनी सहभाग दिला. इंडियन मेडिकल असोसिएशन ते सदस्य आहेत. २०१४ मध्ये डॉ. काळगे यांनी भाजपकडून लातूर लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. त्यानंतर २०१९ साली त्यानी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यावेळी ती मिळाली नाही. मात्र, काँग्रेस पक्षाने नवा प्रयोग करण्याचे ठरविले आणि डॉ. काळगे यांना उमेदवारी दिली.
हेही वाचा – बच्चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?
लिंगायत समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न
काँग्रेस पक्षाने यावेळी डॉ. शिवाजी काळगे या राजकारणाचा कसलाही अनुभव नसलेल्या व्यक्तीस उमेदवारी दिली आहे. ते हिंदू माला जंगम जातीचे आहेत जंगम समाज हा लिंगायत समाजाचा गुरु मानला जातो. त्यांनां उमेदवारी दिल्यामुळे लिंगायत समाज सुखावला जाईल व त्याची मोठी मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील. परंपरागत अनुसूचित जमातीच्या मंडळींना प्रतिनिधित्व न दिल्यामुळे ती थोडी नाराज असली तरी वंचितचा उमेदवार निवडणुकीत उतरेल व तो ती मते घेईल त्यामुळे मताचे विभाजन होईल यातून काँग्रेसच्या उमेदवाराला लाभ होईल हा एक विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर लिंगायत मतदार हा काही प्रमाणात देशमुखावर नाराज असतो. हे विलासराव देशमुखांपासून आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख व धीरज देशमुख या दोन्ही बंधूंना याचा लाभ होईल हाही अंदाज बांधण्यात आला आहे.