महेश सरलष्कर

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला असला तरी, काँग्रेसकडूनही उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने पवारांच्या नावाला पाठिंबा देऊन स्वतःहून एक पाऊल मागे घेतले असल्यामुळे २२ विरोधी पक्षांमध्ये संभाव्य उमेदवारासाठी अन्य नावांवर चर्चा केली जात आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी तसेच माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे नेते डी. राजा यांनी बुधवारी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. ममता बॅनर्जी आणि पवार यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या तीनही नेत्यांनी पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी पवारांनी होकार दिला तर, कुंपणावर बसलेले पण, भाजपवर नाराज असलेले पक्षही पवारांना पाठिंबा देतील असे या नेत्यांचे म्हणणे होते. पण, पवारांनी या नेत्यांना ठामपणे नकार दिला. सक्रिय राजकारण सोडण्याची इच्छा नसल्याचे पवारांनी विरोधी पक्षनेत्यांना स्पष्ट सांगितले आहे.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) बहुमताचा आकडा आहे. भाजपच्या उमेदवाराला सुमारे २० हजार मतमूल्यांची गरज असून बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस हे दोन पक्ष अपेक्षित मतमूल्यांचा आधार भाजपला देऊ शकतात. विरोधकांच्या महाआघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसेल तर कशासाठी उभे राहायचे? काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक वगळली तर, पवार कोणतीही निवडणूक हारलेले नाहीत. मग, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभव कशासाठी पत्करायचा, असा विचार पवारांच्या नकार देण्यामागे असल्याचे मानले जाते. विरोधी पक्षनेते पवारांना सातत्याने आग्रह करत असले तरी, प्रत्येकाने स्वतंत्र निर्णय घ्यायचे असतात. एका मर्यादेपलिकडे कोणीही आग्रह वा दबाव आणू शकत नाही. शिवाय, पवारांसाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारदेखील महत्त्वाचे आहे. पवार राष्ट्रपती पदासाठी उत्सुक नसल्यामागे हेही कारण असल्याचे सांगितले जाते.

विखे पिता-पुत्रांच्या भूमिकांनी राजकीय चर्चांना उधाण!

सध्या काँग्रेस वेगवेगळ्या अडचणीत सापडला असून प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसला स्वतःचा उमेदवार देणेही शक्य झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया यांनी यांनी पवारांसह अन्य विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद साधला होता. काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करणार नाही, विरोधी पक्षांनी चर्चा करून सहमतीचा उमेदवार निश्चित करावा, त्या उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देईल असेही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, सोनिया गांधी यांनीच पवारांनी राष्ट्रपती पदासाठी उभे राहावे अशी विनंती केली होती. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या निवडीत काँग्रेसने स्वतःहून एक पाऊल मागे घेतले आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने होत असलेल्या बैठकांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

पवार आणि बॅनर्जी यांची भेट झाल्यानंतर मंगळवारी काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला यांना चर्चांमध्ये सहभागी होण्यास सांगितले. राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरविण्यामध्ये तृणमूल काँग्रेसने पुढाकार घेतल्यामुळे काँग्रेस, डावे पक्ष व द्रमुक नाराज झाल्याचे मानले जात होते. सोनिया गांधी यांनी स्वतःहून विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधला असताना ममता बॅनर्जी यांनी बैठकीसाठी नेत्यांना पत्र का पाठवले? हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. पण, डावे पक्षांचे प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित राहण्यास तयार झाल्याने राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी कोणी पुढाकार घेतला, हा मुद्दा आता वादग्रस्त राहिलेला नाही.

भाजपच्या मराठा राजकारणातून विनायक मेटे वजा?

दिल्लीत कॉन्स्टिट्युशन क्लबमधील बुधवारच्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली तरी, २० वा २१ जून रोजी पुन्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यामध्ये विरोधकांच्या सहमतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल. काही विरोधी पक्षांकडून प्रामुख्याने गोपालकृष्ण गांधी यांचे नाव सुचवले जात आहे. याशिवाय, गुलाम नबी आझाद, यशवंत सिन्हा, फारुक अब्दुल्ला, नितीश कुमार यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून सुचवण्यात आल्याचे समजते. अखेरपर्यंत पवार हे नकारावर ठाम राहिले तर मात्र विरोधकांना पुढील आठवड्यातील बैठकीत अन्य काँग्रेसेतर उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.

Story img Loader