हर्षद कशाळकर
अलिबाग : मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा या मतदारसंघातून सलग तीन वेळा पराभव झाल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसे झाल्यास शिवसेना उध्दव ठाकरे गटाला रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघावर पाणी सोडावे लागण्याची चिन्ह दिसत आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपने मावळ आणि रायगड या दोन्ही जांगावर दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे आता मावळचा मतदारसंघ मिळावा अशी आग्रही भुमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही धुसफूस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा… विदर्भातही शिंदे गटाच्या विरोधात भाजपमध्ये खदखद वाढली
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारीणी सभा अलिबाग येथे बुधवारी पार पडली. या बैठकीला प्रदेश प्रतिनिधी आणि जिल्हा प्रभारी उपस्थित होते. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसकडून घ्यावा. आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तशी मागणी काँग्रेस प्रभारी एस के पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे काँग्रेसचे सहप्रभारी श्रीरंग बर्गे यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.
रायगड आणि मावळ हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली आहे. तर शिवसेना हा त्यांचा प्रमुख विरोधक राहीला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राजकीय समिकरणे कमालीची बदलली आहेत. यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीत जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जागा वाटपात शिवसेना उध्दव ठाकरे गटाला सामावून घेणे अडचणीचे ठरणार आहे. याची चिन्ह आता दिसून लागली आहेत.
हेही वाचा… जमाखर्च : अब्दुल सत्तार, कृषिमंत्री; सरकारची ‘नामी – बदनामी’ करणारे मंत्री
रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. तर मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत. बारणे हे शिंदे गटात सहभागी झाले असले तरी शिवसेना उध्दव ठाकरे गट या मतदारसंघावरील आपला दावा सोडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. ज्यात त्यांचा पराभव झाला असला, तरी मतदारसंघावरचा दावा कायम रहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे. अशातच काँग्रेसने मावळ मतदारसंघ हवा असल्याचे जाहीर केल्याने एकाच मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटकपक्ष दावेदार असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा… भंडाऱ्यात शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपची मतपेरणी!
रायगड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. पण पक्षांतर्गत फुटीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात सहभगी झाले आहेत. अशावेळी मावळ आणि रायगड या दोन्ही जांगासाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाने आग्रह धरला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही मागणी मान्य करणार नाही. अशा परिस्थितीत दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाला पाणी सोडावे लागण्याची शक्यता अधीक आहे. लोकसभेच्या जागा वाटपानंतर हा तिढा कसा सुटणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.