लातूर : औसा विधानसभा मतदारसंघातील लिंगायत समाज आक्रमक झाला असून विधानसभेला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले नाही तर मतदान करणार नाही, असा इशारा लिंगायत समाजातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका बैठकीतून दिला आहे. औसा तालुक्यातील तपसे चिंचोली या गावी शेषराव पाटील यांनी औसा तालुका व परिसरातील लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीस शेषराव पाटील, माधवराव पाटील, चंदर मामा पाटील रामदास चव्हाण, विद्याताई पाटील, पंडित धुमाळ, राजू पाटील आदी उपस्थित होते.
२००९ व २०१४ अशा सलग दोन विधानसभेच्या वेळी बसवराज पाटील मुरूमकर हे औसा विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील मुरूमकर यांचा पराभव केला. त्यांच्या पराभवात काँग्रेसच्या एका गटाचा छुपा विरोध होता, त्यामुळेच मुरुमकरांचा पराभव झाला याची लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांना खात्री होती. यावेळी भाजपचे अभिमन्यू पवार हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात राहतील तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळेच लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेषराव पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली आहे. अभिमन्यू पवार निवडून आले काय आणि दिनकर माने निवडून आले काय, लिंगायत समाजाला याचा काय लाभ, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना बैठकीत व्यक्त केल्या.
हेही वाचा – अशोक चव्हाणांवर कुरघोडीसाठी काँग्रेसची खेळी, भोकरमध्ये ‘भूमिपुत्रच हवा’चा नारा!
शेषराव पाटील हे शिवराज पाटील चाकूरकरांचे मामा त्रिंबकराव यांचे चिरंजीव, ते अनेक वर्ष औसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्षही होते. त्यांनी पुन्हा सक्रिय व्हायला हवे, असा आग्रह धरण्यात आला. या बैठकीत मराठा समाज तालुक्यात २४ टक्के आहे तर लिंगायत समाज २२ टक्के आहे. त्यामुळे आमच्या समाजाला प्रतिनिधित्वच दिले जाणार नसेल तर आम्ही मत तरी का द्यायचे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या बैठकीत लिंगायत समाजाव्यतिरिक्त अन्य अल्पसंख्यांक समाजाचे नेते उपस्थित होते. ते म्हणाले तालुक्यात २४ टक्के मराठा आहे व उर्वरित ७६ टक्के सर्व जाती जमातीचे लोक आहेत. शेषराव पाटील यांनी या सर्वांची बैठक घ्यावी, असेही त्यांना सूचविण्यात आले. लिंगायत समाज हा विधानसभा निवडणुकीत गप्प बसणार नाही. २०१९ च्या निवडणुकीत मुरूमकर यांचा झालेला पराभव समाजाच्या जिव्हारी लागला असून यावेळच्या निवडणुकीत आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे यासाठी तो आग्रही झाल्याचे दिसून येत आहे.
© The Indian Express (P) Ltd