सांंगली : विधानसभा निवडणुकीमध्ये आपण प्रतिनिधीत्व करणार नसल्याचे जाहीर करून आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीच्या राजकीय क्षेत्रात धक्का दिला आहे. त्यांच्या या निर्णयावर अद्याप भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी उमेदवारीबाबत भाजपमध्ये पेच निर्माण होणार आहे पक्षांतर्गत वाढता विरोध, उमेदवारीचा संघर्ष या गदारोळात सहानभुती निर्माण करण्याचा प्रयत्नही यामागे असू शकतो. कार्यकर्त्यांचा दबाव आणि पक्षादेशाचा दिखावा करून तिसर्‍यांदा गाडगीळ यांचाच चेहरा सांगलीकरासमोर येउ शकतो. मात्र, सध्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे जशी भाजपमधील इच्छुकांची झोप हरवली तशीच विरोधकांनाही निद्रानाशाला सामोरे जावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगलीच्या सराफी पेढीवर विश्‍वासाचे दुसरे नाव म्हणून गाडगीळ सराफ असे समिकरण गेल्या तीन पिढ्यापासून चालत आले असले तरी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मोदी लाटेत याच घराण्यातील सुधीर गाडगीळ यांना आमदारकीची संधी मिळाली. आपल्या मितभाषी स्वभावातून राजकारण विरहीत चेहरा म्हणून ते सांगलीत परिचित झाले.यानंतर गत निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे ठाकले असताना त्यांना विजय खेचून आणला. आता पुन्हा हॅटट्रिक करण्याची वेळ आली असताना अखेरच्या क्षणी आमदारकीच्या निवडणुकीतून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. गेली सहा महिन्यापासून त्यांचा याबाबतचा विचार सुरू होता. कुठेतरी थांबले पाहिज, नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असे सांगत त्यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून बाजूल होण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.

हे ही वाचा… ५० पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याची किमया शरद पवार पुन्हा साधणार ?

हा निर्णय घेण्यापुर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी अद्याप त्यांच्या हा निर्णय पक्षाने स्वीकारला असल्याचे जाहीर केले नसले तरी गाडगीळ वगळून अन्य कोणता चेहरा द्यावा याचा पेच पक्षापुढे राहणार आहे.महिलांना संधी म्हणून पक्षाच्या निष्ठावान नेत्या म्हणून नीता केळकर, प्रदेश पातळीवर काम केलेेले आणि महापालिका क्षेत्रात पक्ष विस्ताराबरोबरच सर्वांशी सलोख्याने राजकीय जीवनात कार्यरत असलेले शेखर इनामदार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून प्रतिनिधीत्व करत शहराशी रोजचा संपर्क ठेवून असलेले शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, पृथ्वीराज पवार आदी नावे तर चर्चेत आहेतच. पण या पैकी कोणता चेहरा चालेल याचा विचार भाजपला करावा लागेल. मराठा आरक्षणावरून पक्षाबाबत निर्माण झालेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी चेहरा बदलत असताना बदलत्या सामाजिक धु्रवीकरणाचाही विचार पक्षाला करावा लागणार असे दिसते.

दुसर्‍या बाजूला विरोधक म्हणून कोण येणार हाही सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासाठी काही माजी नगरसेवक आग्रही तर आहेतच, पण याचबरोबर गत निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारला असतानाही पक्ष म्हणून कार्यरत राहणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात उमेदवारीसाठीचा संघर्ष सुरू झाला आहे. आमदार गाडगीळ हेच भाजपचे उमेदवार असतील असे धोरण ठेवून विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू असताना गाडगीळ यांच्या नव्या भूमिकेमुळे नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

हे ही वाचा… निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक

आमदार गाडगीळ यांच्या निवडणुकीपासून अलिप्त होण्याच्या निर्णयामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असली तरी पक्षांतर्गत इच्छुकांच्या दाव्याला बळ मिळणार आहे. इनामदार असो व डोंगरे यांच्या उमेदवारीच्या संघर्षात पक्षाकडून गाडगीळ यांचे मतपरिवर्तन करण्याचाच पहिल्यांदा प्रयत्न होतील असे दिसते. या राजकीय मांडणीत विरोधकांकडून कोणत्या खेळ्या केल्या जातात यावर भाजपचा उमेदवार निश्‍चित केला जाउ शकतो. काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या उमेदवारीच्या लढ्यात कदाचित उमेदवाराची उसनवारीही केली जाउ शकते असे दिसते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pressure politics within bjp by sudhir gadgil in sangli print politics news asj