मुंबई : कल्याण तालुक्यातील गणपती मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, पुजारी व पूर्णवेळ सेवकांची पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा >>> अतिआत्मविश्वासाचा फटका! प्रदेश भाजपच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांचे आत्मपरीक्षण
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील शिळगावात एका ३० वर्षीय महिलेवर येथील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना ९ जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेतील आरोपींना उचित शिक्षा व्हावी याकरिता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी, अशा घटना भविष्यात घडू नये याकरिता राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे येथे सीसीटीवी बसविण्यात यावेत, धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत कर्मचारी, पुजारी व पूर्णवेळ सेवक यांची नजीकच्या पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, तसेच महिलेचे आप्त व कुटुंबीयांना मानसोपचार सेवा व समुपदेशन पुरविण्यात यावे, अशी सूचना गोऱ्हे यांनी पत्रात केली आहे.