अकोला : काँग्रेसचे सरकार ज्या राज्यात येते ती राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’ होऊन जातात. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक राज्याची आता तीच स्थिती झाली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी कर्नाटक, तेलंगणामध्ये काँग्रेसने हप्ते घेतले. कर्नाटकमध्ये मद्याविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली केली, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोल्यातील कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार अनुप धोत्रे, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, उमेदवार रणधीर सावरकर, डॉ. संजय कुटे, विजय अग्रवाल उपस्थित होते. मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ‘एक है, तो सेफ है’ असा नारा देत त्यांनी काँग्रेससह गांधी परिवारावर देखील जोरदार निशाणा साधला.

हेही वाचा >>>महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा

मोदी म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्प मंजूर केले. महाराष्ट्रातील बंदरासाठी ८० हजार कोटींची तरतूद केली. वाढवण बंदर भारतातील सर्वात मोठे असेल. देशात गरिबांसाठी चार कोटी पक्की घरे बनवून दिली. आणखी तीन कोटी नवीन घरे बनवली जात आहेत.

काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नव्हता. तो मोदी सरकारने मिळवून दिला. काँग्रेसची सत्ता ज्या राज्यात येते, ते शाही कुटुंबाचे ‘एटीएम’ होऊन जाते. केवळ पैसा काढला जातो. घोटाळे करून निवडणूक लढणारी काँग्रेस जिंकली तर राज्यात किती भ्रष्टाचार, घोटाळे करेल, असा सवाल करून महाराष्ट्रात सावधान राहण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

काँग्रेसने दलितांवर अत्याचार केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने वारंवार अपमानित केले, असेही मोदी म्हणाले. प्रास्ताविक खासदार अनुप धोत्रे यांनी केले.

संविधान घेऊन फिरणारे ढोंगी

काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, ते होऊ देणार नाही. संविधान घेऊन फिरणारे ढोंगी आहेत. त्यांनी ७५ वर्ष काश्मीरमध्ये संविधान लागू होऊ दिले नाही, अशी टीका मोदी यांनी केली.

म्हणून ९ नोव्हेंबर ऐतिहासिक दिवस

९ नोव्हेंबर ऐतिहासिक तारीख आहे. २०१९ साली आजच्याच दिवशी राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला होता. त्यावेळेस संपूर्ण देशातील सर्वधर्मियांनी संवेदनशीलतेचा परिचय दिला. राष्ट्र प्रथमची ही भावना भारताची सर्वात मोठी ताकद आहे, असे मोदी म्हणाले.

\

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi criticism of congress ruled states at a campaign meeting in akola print politics news amy