गेली काही वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ लहान भाऊ ‘ असा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता त्यांना विकास प्रकल्प रोखणारे ‘ भ्रष्टाचारी खलनायक ‘ ठरविले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडगोळीने सुरू केलेल्या कामांच्या धडाक्याचे भरभरून कौतुक करीत त्यांना भक्कम पाठबळ असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
हेही वाचा- शीख दंगलीवरुन राहुल गांधी पुन्हा टार्गेट; माफीच्या मागणीवर म्हणाले, “निरपराध लोकांचा बळी जाणं…”
मुंबईचा कायापालट करणाऱ्या सुमारे ३९ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन, मेट्रोच्या दोन टप्प्यांचे लोकार्पण आणि पंतप्रधान स्वनिधी योजनेतील निधीवाटप वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेत करताना पंतप्रधान मोदी यांनी आता मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्याचे लक्ष्य असल्याचाच निर्वाळा देत निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. तेव्हा अनेक वर्षे लहान भाऊ असलेल्या उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना आणि महाविकास आघाडीला मात्र पंतप्रधान मोदी यांनी मुंबई व राज्यातील विकासाच्या मार्गातील आणि सर्व सामान त्यांच्या मदतीत अडथळे आणल्याचे खापर फोडत खलनायक ठरविले आहे.
राजकारणात कोणी कोणाचेही नसतात किंवा नातेसंबंधही नसतो आणि नातेवाईकही हाडवैरी होतात. भाजपा आणि शिवसेना यांचे नातेही असेच आहे. देशातील राजकारणात सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे ३० वर्षे टिकलेली त्यांची युती होती. भाजपाबरोबर असताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा कायमच केला. मात्र २०१४ मध्ये युती तुटली आणि विधानसभा स्वतंत्र लढल्यावर पुन्हा राज्यातील सत्तेसाठी दोघे एकत्र आले. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी राज्यात एकत्र असताना दोघे निकराने लढले. पण दोन जागा कमी पडल्याने राज्यातील सत्ता राखण्यासाठी भाजपने माघार घेऊन पहारेकऱ्याची भूमिका घेतली आणि शिवसेनेला पालिकेत सत्ता दिली. मात्र या ३० वर्षांच्या कालखंडात शिवसेनेबरोबर असताना भाजपने सत्तेसाठी शिवसेनेच्या कथित भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली आणि विकासमार्गातील अडथळा असूनही साथ कायम ठेवली.
हेही वाचा- फेरीवाले, गोरगरीब मजुरांना पंतप्रधान मोदी यांची साद
कोकणातील नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्पासह अनेक मुद्द्यांवर शिवसेनेची भूमिका मान्य केली. महापालिकेतील रस्त्यांच्या कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी २०१८ मध्ये झाल्यावर केवळ कंत्राटदार आणि पालिका अभियंते-अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. ती राजकीय नेत्यांपर्यंत पोहचलीच नाही. राजकारणात सोयीचे नातेसंबंध जपताना राजकीय हित आणि सत्ता यांनाच भाजपाने प्राधान्य दिले.
शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन करून भाजपाशी बेईमानी केल्याने राज्यातील सत्ता हिसकावून घेऊन भाजपाने राजकीय सूड तर उगवलाच आहे. आता महापालिकेतील सत्ता मिळविण्याचा चंग बांधला असून पंतप्रधान मोदी या मोहीमेवर जातीने लक्ष ठेवून असल्याचाच प्रत्यय मोदींच्या मुंबई भेटीतून आला आहे. केंद्रात २०१४ पासून नऊ वर्षे आणि राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता असताना शिवसेना बरोबर असल्याच्या कालखंडात भ्रष्टाचार आणि विकास मार्गात अडथळे आणूनही कारवाई झाली नाही. तर आताही शिंदे गटातील आमदार-खासदार, व अन्य नेते यांना अभय देत केंद्रीय तपास यंत्रणा कारवाईचा वरवंटा फिरवत आहेत. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता कारवाईस जोर येईल आणि धागेदोरे थेट ‘ मातोश्री ‘ पर्यंत जातील, असेच संकेत दिसत आहेत.
हेही वाचा- राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या पुत्राची निवडणूक रिंगणात उडी
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस या जोडगोळीने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कामांचे तोंडभरून कोतुक करीत त्यांच्या पाठिशी भक्कमपणे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्रीपद हुकल्याने आणि सरकार चालविताना अनेक मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस यांच्यात वाद असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू असताना शिंदे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून या वादाला भाजपा श्रेष्ठींकडून सध्यातरी खतपाणी घातले जाणार नाही, असे संकेतही दिले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्वनिधी योजनेच्या निधीवाटपाची सुरूवात करून एक लाखाहून अधिक फेरीवाले, टपरीवाले यांना आर्थिक लाभ देण्यात आला आहे. अन्य शहरांमधील फेरीवाले, टपरीवाले यांनाही योजनेचा लाभ दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक राजकीय रणनीतीची दिशाही दाखविली आहे. या निवडणुका अटीतटीच्या होतील. पारंपरिक मतदार भाजप व अन्य पक्षांकडे राहीलच. पण फेरीवाले, टपरीधारक यामध्ये उत्तरभारतीयांचे प्रमाण अधिक असून या वर्गाला आपल्याकडे खेचण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.