संतोष प्रधान
उत्तर, पश्चिम वा पूर्वेकडील राज्यांमध्ये बस्तान बसविलेल्या भाजपला अजूनही दक्षिण भारतात तेवढे स्थान निर्माण करता आलेले नाही. कर्नाटक व तेलंगणाच्या मतदारांनी नाकारल्या नंतर भाजपने तमिळनाडूतील मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात लागोपाठ दुसऱ्या वर्षी काशी – तामीळ संगमचे आयोजन करून तमिळनाडूतील तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
वाराणसीत ३१ डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या काशी-तामीळ संगमचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घघाटन झाले. ‘तमिळनाडूतून काशीला पोहचणे म्हणजे मदुराईच्या मिनाक्षी मंदिरापासून विशालकाशीला पोहचण्यासारखे आहे’ असे उद्गगार मोदी यांनी या वेळी काढले. तसेच काशी आणि तमिळनाडूतील नागरिक एकत्र येणे हे उभयतांमधील भावनिक नाते असल्याचेही मोदी म्हणाले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘वन्नकम काशी, वन्नकम तमिळनाडू’ अशी तामीळमधून भाषणाला सुरुवात करीत तमिळनाडूतील नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षीही असाच कार्यक्रम काशीमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर याच धर्तीवर गुजरातमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या वर्षीही असाच कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमानिमित्त तमिळनाडूतील तरुण, विद्यार्थी, शेतकरी, महिला व छोट्या उद्योजकांना खास काशीची सहल घडविली जाणार आहे.
हेही वाचा… आसाम सरकारने मदरशांची नावे बदलण्याचा निर्णय का घेतला? विरोधकांकडून टीका का केली जातेय?
काशी – तामीळ संगम हा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम असला तरी त्यातून राजकीय हित साधण्याचा केंद्रातील सत्ताधारी भाजपचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. तमिळनाडूत भाजपला अद्यापही हातपाय पसरता आलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकबरोबर आघाडीत भाजपचे चार आमदार निवडून आले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढताना भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली होती. यातूनच तमिळनाडूत भाजपला आशादायी चित्र दिसत आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सध्या सत्ताधारी द्रमुकच्या मागे ईडी या केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. भविष्यात तमिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकला पिछाडीवर टाकून पुढे येण्याची भाजपची रणनीती दिसते.
हेही वाचा… पुसदच्या पाणी पुरवठा योजनेवरून सत्ताधारी खासदार-आमदारांतच वाद पेटला
भाजपचा भर हा हिंदी राष्ट्रीय भाषेवर असतानाच तमिळनाडूत हिंदी लादण्यास विरोध केला जातो. काशी-तामीळ संगमच्या माध्यमातून तमिळनाडूतील तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. आतापासूनच प्रयत्न केल्यास भविष्यात भाजपला संधी मिळू शकेल, असे भाजपचे गणित असावे. यामुळेच दक्षिण भारतात भाजपला बस्तान बसविता येत नसल्यानेच लोकसभेच्या ३९ जागा असलेल्या तमिळनाडूत ताकद वाढविण्यावर भाजपने भर दिला आहे.