मुंबई : शिवडी- न्हावाशेवा अटल सागरी सेतूसह विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन, नाशिकमधील युवा महोत्सवाला उपस्थिती, नाशिकमध्ये काळाराम मंदिराचे दर्शन यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढविणार आहेत. भाजप व मित्र पक्षांना राजकीय लाभ होईल अशा पद्धतीनेच मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये रोड शो, काळाराम मंदिरात दर्शन आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाला उपस्थित राहिल्यावर ते मुंबईत दाखल होणार आहेत. मोदी यांच्या मुंबई व नवी मुंबई दौऱ्यात शिवडी-न्हावा शेवा पुलाच्या उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम आहे. याबरोबरच ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याचे भूमिपूजन, नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण, वसई-विरार आणि मीरा-भाईंदरच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण, सीवूड-बेलापूर-उरण रेल्वे गाडीचा प्रारंभ, सातांक्रूझ ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण, नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानकाचे उद्दाटन मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील कार्यक्रमात कळ दाबून करण्यात येणार आहे.
हेही वाचा : सांगलीत लोकसभेपूर्वीच भाजपच्या मंडळींना विधानसभेचे वेध !
नाशिकमधील रोड शो च्या माध्यमातून नाशिककरांना जोडण्याचा मोदी यांचा प्रयत्न असेल. नवी मुंबईतील कार्यक्रमात मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील विविध प्रकल्पांचा शुभारंभ करीत मोदी मतदारांना आकर्षित करणार आहेत. अयोध्येतील राममंदिराच्या २२ तारखेला होणाऱ्या उद््घटानपूर्वी भाजपने देशभर वातावरणनिर्मिती केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यात काळाराम मंदिराला भेट देऊन नाशिककरांची मते जिंकण्याचा मोदी यांचा प्रयत्न असेल.
हेही वाचा : भव्यदिव्य कार्यक्रमांच्या आयोजनातून सुधीर मुनगंटीवार यांची मतपेरणी
आगामी लोकसभा निव़डणुकीच्या दृष्टीने भाजप किंवा महायुतीला राजकीय फायदा होईल, अशा पद्धतीनेच कार्यकमांचे नियोजन करण्यात आले आहे. एक प्रकारे राज्यातील महयुतीच्या प्रचाराचे रणशिंगच मोदी फुंकणार आहेत. मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांचा अधिकाधिक फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या दृष्टीने मोदी यांच्या दौरयाच्या मार्गावर किंवा आसपासच्या परिसरात भाजपने वातावरण निर्मितीवर भर दिला आहे.