नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. विविमंडळातही त्याचे पडसाद उमटले, दंगलीची धग आता कमी होत आहे, जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० मार्चला नागपूर दौरा होतो आहे. दंगलीमुळे अशांततेचे, अस्वस्थतेचे वातावरण असलेल्या नागपूरमध्ये मोदींचा दौरा महत्वाचा ठरणारा आहे.
नागपूरची दंगल सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली ती पोलिसांना या घटनेचा अंदाज न आल्याच्या कारणाने. शहराच्या एका विशिष्ट भागातच दंगल झाली असली तरी ज्या प्रकारे ती भडकली त्यामुळे त्यांची व्याप्ती सर्वदूर पोहचली आहे. शहराच्या सामाजिक ऐकोप्याला यामुळे तडे गेले आहे, समाजमन सुन्न झाले आहे, औरंगजेबाची कबर नागपूरमध्ये नसताना ती तोडण्यासाठी येथे आंदोलन करण्यात आले. दिवसभर या आंदोलनाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, अन रात्री अचानक दंगल उसळली. त्यात पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर हल्ले झाले यावरून पोलीस किती गाफिल होते हे स्पष्ट होते. पोलिसांच्या गुप्तचर खात्याचे अपयश ठसठशीतपणे दिसून येते.
सध्या दंगल शमली असली तरी पोलीस तपासात रोज नवनवीन गोष्टी उघड होत आहे. दोन समाजात पडलेली दरी कायम आहे. विशिष्ट समाजाचा पोलिसांवर राग आहे, त्यामुळे सध्या शहरातील दंगलग्रस्त भागात दिसत असलेली शांतता पुढच्या काळातही कायम ठेवण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणर आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे प्ंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत माधव नेत्रालयाच्या नव्या विस्तारित इस्पितळाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होऊ घातले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींच्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणिराष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला महत्व आहे. या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही नागपूर पोलिसांवर आहे.
पंतप्रधान स.१० वाजता नागपूरमध्ये दाखल होणार असून ११.३० पर्यंत शहरात येणार आहेत. पंतप्रधानांची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असली तरी त्यानिमित्ताने लागणारा बंदोबस्त, शहरातील संवेदनशील भागातील हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक पोलिसांवरच आहे. नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी चौखपणे पार पाडण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम हा तसा शहराबाहेर (हिंगणा) आहे. हिंसाचारग्रस्त भाग आणि कार्यक्रमस्थळ याच्यात मोठे अंतर आहे. पण सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांना सजग रहावे लागणार आहे. या कार्यक्रममाला राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. दंगलीनंतर होत असलेला हा कार्यक्रम सुरक्षितपणेपार पाडावा म्हणून पोलीस यंत्रणा मेहनत घेत आहेत.