तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र तथा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानामुळे देशभरात वादंग निर्माण झाले आहे. सनातन धर्माचे उच्चाटन करायला हवे, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेत विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीचीही हीच भूमिक आहे का? असा सवाल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उदयनिधी यांची पाठराखण केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र तथा कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले प्रियांक खरगे यांनीदेखील उदयनिधी यांची पाठराखण केली. प्रियांक यांनी या प्रकरणावर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
“प्रत्येक धर्माने समानतेचे तत्त्व मानले पहिजे”
उदयनिधी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना ‘जो धर्म प्रत्येकाला समान अधिकार देत नाही, प्रत्येकाला मानव म्हणून वागणूक देत नाही, तो धर्मच नाही,’ असे प्रियांक खरगे म्हणाले होते. खरगे यांच्या या विधानानंतर त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या दाखल गुन्ह्यावर प्रियांक खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी दोन मुद्दे मांडल्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पहिला मुद्दा म्हणजे प्रत्येक धर्माने समानतेचे तत्त्व मानले पहिजे. प्रत्येक धर्माने माणसांमध्ये भेदभाव केला नाही पाहिजे, असे मी म्हणालो होतो. भारतीय संविधान हाच माझा धर्म आहे. संविधान मला समानता आणि समान संधी देते. त्यामुळे हाच माझा धर्म आहे, असे मी म्हणालो होतो. मला वाटतं मी हे जे काही बोललो आहे, त्यावर तक्रार करणाऱ्यांना आक्षेप असावा. मी जे बोललो, ते त्यांना चुकीचे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझ्या मतावर ठाम राहणार आहे,” असे प्रियांक खरगे यांनी स्पष्ट केले.
“समाजासाठी असा धर्म चांगला नाही”
जो धर्म लोकांना समान मानत नाही. भेदभाव करतो. असा धर्म हा चांगला नाही, असे मी म्हणालो होतो. समाजासाठी असा धर्म चांगला नाही. देशासाठीही हे चांगले नाही. राष्ट्र उभारणीसाठीदेखील हे चांगले नाही. भाजपा आणि भाजपाला समर्थन करणाऱ्यांना माझ्या या मताशी काही अडचण आहे का? असा सवालही त्यांनी केला.
“आम्हाला आर्थिक, समाजिक समानता हवी आहे”
उदयनिधी यांनी सनातन धर्मावर भाष्य केल्यानंतर हा विरोधकांच्या आघाडीचा अजेंडा आहे का? असा सवाल भाजपाकडून केला जात आहे. यावरही प्रियांक खरगे यांनी भाष्य केले. “इथे अजेंडा, धोरणाचा प्रश्नच येत नाही. हा संविधानाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. समाजात प्रत्येकाला समान संधी मिळायला हावी. समानतेच्या आधारावर समाजनिर्मिती व्हायला हवी, अशी काही घटनात्मक मूल्ये आहेत. आम्हाला आर्थिक, समाजिक समानता हवी आहे. माझे माझ्या वडिलांपेक्षा किती वेगळे विचार आहेत, याची मला कल्पना नाही. मात्र मी गौतम बुद्ध, बसवेश्वर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने चालतो,” असे प्रियांक खरगे यांनी स्पष्ट केले.