राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आज (२६ मार्च) प्रियांका गांधी यांनी दिल्लीमधील राजघाटावरील सत्याग्रहादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, मला तुरुंगात टाक. मात्र सत्य हेच आहे की, नरेंद्र मोदी हे भित्रे आणि अहंकारी आहेत, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे, असा दावा केला.
हेही वाचा >>> Karnataka : आरक्षण रद्दच्या निर्णयामुळे मुस्लिमांमध्ये असंतोष, कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा!
जनता अंहकारी राजाला उत्तर देईल
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भित्रे आहेत. त्यांनी माझ्याविरोधातही गुन्हा दाखल करावा. मलाही तुरुंगात टाकावे. मात्र नरेंद्र मोदी हे भित्रे आहेत, हेच सत्य आहे. ते सत्तेच्या आड लपून बसले आहेत. भारताला फार जुनी परंपरा आहे. जनता अंहकारी राजाला उत्तर देईल,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
हेही वाचा >>> राजकीय पाठशिवणीचा खेळ पुन्हा नव्याने, महाविकास आघाडीच्या सभेनंतर शिवसेनेची धनुष्यबाण यात्रा
जे प्रश्न विचारतात, त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न
“राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले. मात्र मोदी त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाहीत. मोदींना या प्रश्नांची भीती वाटली. ते लोकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे प्रश्न विचारतात, त्यांना नेस्तनाबूत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मोदी यांनी देशाची सर्व संपत्ती अदाणी यांना देऊ केली,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच अदाणींमध्ये असं नेमकं काय आहे? मोदी अदाणी यांना वाचवण्याचा का प्रयत्न करत आहेत? असा सवालही प्रियांका गांधी यांनी केला.
हेही वाचा >>> शेतकरी चळवळीतील दोन खंदे शिलेदार एकत्र येणार?
राहुल गांधी यांच्या पदव्या तुम्ही पाहिलेल्या आहेत का?
राहुल गांधी यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेवरूनही प्रियांका गांधी यांनी मोदी यांना लक्ष्य केले. “राहुल गांधी यांना तुम्ही पप्पू म्हणता. मात्र तुम्ही राहुल गांधी यांच्या पदव्या तुम्ही पाहिलेल्या आहेत का? तुम्हाला सत्य माहिती नाही, तरीदेखील तुम्ही त्यांना पप्पू म्हणता. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत लाखो लोक आले. राहुल गांधी प्रामाणिक आहेत. ते लोकांमध्ये मिसळत आहेत. ते लोकांच्या अडचणी जाणून घेत आहेत. लोक राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहेत,” असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.