उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली होती काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी. प्रियांका याकाळात उत्तर प्रदेशात ठाण मांडून बसल्या होत्या. प्रचारासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील गावागावात प्रवास केला होता. उत्तर प्रदेशातील या निवडणुकीला आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बघितले जात आहे. मात्र १० मार्चला निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर प्रियांका गांधी जणू उत्तर प्रदेशच्या राजकारणातुन अज्ञातवासातच गेल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशला एकदाही भेट दिली नाही.

आतापर्यंतची सर्वात वाईट अवस्था

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्या नेतृवाखाली काँग्रेस पक्षाने महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करण्याची उत्साही मोहीम हाती घेतली. असे असूनही काँग्रेसने लढवलेल्या एकूण ४०३ जागांपैकी फक्त २ जागांवर त्यांना विजय मिळवला आला. एकूण मतांच्या केवळ २.३३% मते काँग्रेसच्या वाट्याला आली. देशातील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्वाच्या असणाऱ्या राज्यात देशातील सर्वात जुन्या पक्षाची आतापर्यंतची सर्वात वाईट अवस्था झाली होती. पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे की आम्हाला यापेक्षा चांगल्या निकालाची अपेक्षा होती. मात्र इतक्या वाईट पराभवाची अपेक्षा नव्हती. या निकालाचे परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

प्रियांका गांधी यांचे मौन

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या बाबतीत सोशल मीडियावरसुद्धा मौन बाळगले आहे. मतदानापूर्वी त्या राज्याच्या विविध विषयांवर ट्विट करायच्या. ट्विटरच्या माध्यमातून त्या भाजपा सरकारला अनेकवेळा खडे बोल सुनवायच्या आणि मनातील संताप व्यक्त करायच्या. 

उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या सक्रिय सहभागामुळे राज्यात काँग्रेसचे वजन वाढत होते. त्याचा राज्याच्या राजकारणावरही परिणाम होत होता. गेल्यावर्षी लाखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर प्रियांका गांधी प्रचंड सक्रिय झाल्या होत्या. पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांनी सितापुरच्या विश्राम गृहात आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पीडित कुटुंबाची भेट घेण्यास परवानगी देणे भाग पडले होते.

कॉंग्रेसमध्ये मरगळ ?

प्रियांका गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे उत्तर प्रदेश कॉंग्रेसमध्ये मरगळ निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.  निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर इथल्या काँग्रेस नेतृत्वाचा राजीनामा घेण्यात आला होता. आता या घटनेला दोन महिने उलटून गेले असले तरी अजूनही नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणूक करण्यात आलेली नाही. असे असूनही राज्यातील काँग्रेस नेते अजूनही सकारत्मक आहेत. लवकरच पक्ष राज्यात जोरदार पुनरागमन करेल असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. प्रियांका गांधी कदाचित १ – २ जूनला लखनऊमध्ये एका कार्यक्रमाला येणार आहेत. तेव्हाच ते पक्षातील नेत्यांना पुढील आदेश देतील असे अपेक्षित आहे.