खलिस्तान समर्थक आणि वारीस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख असलेल्या अमृतपालसिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर भगवंत मान सरकारची वाहवा केली जात आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीनेदेखील मान यांच्या सरकारचे अभिनंदन केले आहे. १८ मार्च पासून पंजाब पोलिसांनी अमृतपालसिंग तसेच त्याच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
शिरोमणी अकाली दल (एसएडी) पक्षाने केला आक्षेप व्यक्त
अमृतपालसिंग वर अटकेची कारवाई केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले आहे. तर सुखबीरसिंग बादल यांच्या शिरोमणी अकाली दल (एसएडी) या पक्षाने यावर आक्षेप व्यक्त केला आहे. मागील काही वर्षांपासून एसएडी पक्षाच्या जनाधारात सातत्याने घट झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा विचार एसएडी पक्षाकडून केला जात आहे.
हेही वाचा >> Karnataka Election 2023 : लिंगायत समाजाची मतं मिळवण्यासाठी सर्वपक्षीयांची धडपड, बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त कोण काय म्हणाले?
…अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल
अमृतपालसिंगचा काका अरजितसिंग तसेच त्याच्या काही सहकाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर २१ मार्च रोजी भगवंत मान यांनी अमृतपालसिंगवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. अमृतपासिंगचे नाव न घेता ” काही घटकांकडून पंजाबमधील वातवारण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटकांकडून प्रक्षोभग भाषणं केली जात होती. ते आपल्या भाषणात कायद्याला आव्हान देत होते. अशा सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा सर्वांनाच अटक करण्यात आली आहे,” असे भगवंत मान म्हणाले आहेत. तसेच अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. आप सरकार असा शक्तींना डोके वर काढण्याची संधी देणार नाही, असेही भगवंत मान यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा >> १२ तासांची शिफ्ट, आठवड्याला ३ दिवसांची सुट्टी; तामिळनाडूच्या विधेयकावर टीका झाल्यानंतर कामगार संघटनांशी चर्चा
या प्रकरणात गोवण्यात आलेल्या तरुणांची मदत केली जाईल- SAD
दरम्यान शिरोमणी अकाली दल या पक्षाने सरकारकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर आक्षेप व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून शिरोमणी अकाली दल पक्ष कायदेशीर अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे पक्षाचा विस्तार करण्यासाठी हीच नामी संधी असल्याचे मत एसएडी पक्षाचे आहे. पोलिसांकडून अमृतपालसिंगच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली जात असताना शिरोमणी अकाली दलाने आक्षेप व्यक्त केला आहे. याबाबत एसएडी पक्षाच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “शिरोमणी अकाली दलाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झालेली आहे. या चर्चेनंतर पक्षाने या प्रकरणात गोवण्यात आलेल्या तरुणांची मदत करण्याचे ठरवले आहे. आमचा पक्ष शीख समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा आहे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. २० वर्षांच्या आतील तरुणांवरही कारवाई केली जात आहे. शीख तरुणांवर होणाऱ्या अन्यायाव्यतिरिक्त हा मानवी अधिकार, भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचाही मुद्दा आहे,” असे हा नेता म्हणाला आहे.
हेही वाचा >> Loksabha Election 2024 : ईदनिमित्त खास भाषण, मोदी सरकारवर हल्लाबोल; मुस्लीम मतांवर ममता बॅनर्जींचा डोळा!
भाजपाने काय भूमिका घेतली?
भगवंत मान यांनी अमृतपालविरोधात राबवलेल्या मोहिमेचे भाजपाने स्वागत केले आहे. “भगवंत मान यांची योग्य वेळी योग्य कारवाई केली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. मला या प्रकरणात राजकारण आणायचे नाही,” असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले आहेत. तर “पंजाबमध्ये खलिस्तान समर्थकांची कोणतीही लाट नाही. अनेकवेळा तसा प्रयत्न काही लोकांकडून केला जातो. मात्र सरकारने त्यांचे काम केले आहे. पंजाब सरकारने चांगले काम केले आहे. त्यांना केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. आम्ही पंजाबमधील घडमोडींवर लक्ष ठेवून आहोत,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.