राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१)अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर विरोधी पक्षांकडून सत्ताधारी भाजपा आणि एकूणच एनडीए आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात येत आहे. संसदेतील ज्या खासदाराला संसदीय कामाचा सर्वाधिक अनुभव असेल, त्याच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपविण्याचा संकेत आहे. मात्र, हा संसदीय संकेत न पाळता, भाजपा आपलेच राजकरण पुढे रेटत असल्याचा आणि संसदीय कार्यपद्धतीला गालबोट लावत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेसचे खासदार कोडीकुन्नील सुरेश हे संसदेतील सर्वांत अनुभवी खासदार आहेत. त्यामुळे संसदीय संकेतांनुसार हंगामी अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पाडण्याची मुख्य जबाबदारी हंगामी अध्यक्षांच्या खांद्यावर असते. त्यांच्या साह्यासाठी इतर तीन खासदारांचीही नियुक्ती केली जाते. त्यामध्ये खासदार कोडीकुन्नील सुरेश यांच्यासहित इतर दोन विरोधी पक्षांमधील खासदारांची निवड करण्यात आली आहे. मात्र, मुख्य हंगामी अध्यक्षपद न मिळाल्याने इंडिया आघाडीकडून सहायक म्हणून असलेल्या नियुक्त्याही नाकारल्या जाण्याची शक्यता अधिक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा