राजेश्वर ठाकरे
नागपूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरच्या शिक्षक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटलेल्या या जागेवर काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान शिवसेनचे (ठाकरे गट) गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांचा अर्ज कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात आता भाजप समर्थित नागोराव गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर आडबाले हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
शिवसेनेला गेलेली नागपूरची जागा नाशिकमधील अनपेक्षित घडामोडींमुळे काँग्रेसला परत मिळाली असली तरी काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत अस्पष्टता होती. पक्षाचे काही नेते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अडबाले यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रही होते तर काहीं नेत्यांचा कल हा शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्याकडे होता. त्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा देण्याबाबत निर्णय होत नव्हता. शिवाय शिवसेना व राष्ट्रवादीचे उमेदवार माघार घेणार का याबाबतही उत्सूकता होती. सोमवारी सेनेचे नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला तरी राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी मात्र अर्ज कायम ठेवला. त्यामुळे इटकेलवार यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे शहर अध्यक्ष इश्वर बाळबुधे यांनी सांगितले.
अखेर काँग्रेसचा निर्णय
अडबाले की झाडे यापैकी कोणला पाठिंबा द्यावा याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. यंग टिचर्स असोसिएशनसह माजीमंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबोले यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे तर विधानपरिषदेचे सदस्य अभिजित वंजारी यांचा आग्रह शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडे यांच्यासाठी होता. अखेर अडबाले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने जाहीर केल्याने तिढा सुटला.