गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतंच गुजरातमधील मेहसाणा येथील टाऊन हॉलमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी अनेक नागरिक उपस्थित होते. यामध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थिनीही होत्या. संबंधित विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षकाने या प्रचारसभेसाठी उपस्थित राहण्यास सागितलं होतं, असा दावा एका विद्यार्थिनीने केला आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना तिने हा गौप्यस्फोट केला.
विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या वेळेत या कार्यक्रमास हजर राहण्यास शिक्षकाने सांगितलं होतं, असंही संबंधित विद्यार्थिनीने सांगितलं. “भाजपाच्या प्रचारसभेला उपस्थित राहण्यापेक्षा त्या वेळात महाविद्यालयात अभ्यास करता आला असता” अशी कबुली तिने दिली.
हेही वाचा- “भाजपा आणि RSSचे नेते आंबेडकरांसमोर हात जोडतात, नंतर पाठीत वार करतात” राहुल गांधींचं टीकास्र!
“आमच्या प्राध्यापकाने सांगितल्यामुळे आम्ही स्मृती इराणींचं भाषण ऐकण्यासाठी आलो आहोत. आम्ही आमच्या कॉलेजच्या वेळात येथे आलोय. स्मृती इराणींच्या प्रचारसभेऐवजी आम्ही महाविद्यालयात अभ्यास करू शकलो असतो,” असे महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने सांगितलं.
हेही वाचा- गुजरातमधील मराठी बहुल मतदारसंघांमध्ये अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभा
स्मृती इराणी मेहसाणा येथे महिला परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी मेहसाणा येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपा उमेदवार मुकेश द्वारकादास पटेल यांचा प्रचार केला. यावेळी गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणहून मुली येथे आल्या होत्या. मुली आणि महिला वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर ‘इंडिया टुडे’नं स्मृती इराणी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही.