मुंबई : आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्यात स्थापन झालेल्या १३ छोट्या पक्षांच्या ‘प्रागतिक आघाडी’ने काँग्रेस पुरस्कृत ‘इंडिया आघाडी’कडे लोकसभेच्या तीन जागांची मागणी केली आहे. राजू शेट्टी यांचा स्वाभीमानी, हितेंद्र ठाकुर यांची ‘बविआ’ आणि अबु आझमी यांचा ‘समाजवादी’ पक्ष यांच्यासाठी या जागा मागण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर राज्यातील डावे व समाजवादी पक्ष हे कायम तिसरी आघाडी स्थापन करतात. यापूर्वी ‘रिडालोस’चा प्रयोग गाजला होता. त्याच धर्तीवर पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १३ पक्षांनी ‘प्रागतिक आघाडी’ स्थापन केली आहे. त्यामध्ये शेकाप, भाकप, माकप, स्वाभीमानी, बहुजन विकास आघाडी, समाजवादी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), लाल निशाण पक्ष, रिपाइं (धर्मनिरपेक्ष), बीआरएसपी, भाकप (माले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष असे १३ पक्ष सहभागी आहेत.
हेही वाचा… राजस्थानमध्ये काँग्रेसचा अखेर ‘साथ साथ है’चा नारा
“आम्ही काँग्रेस पुरस्कृत इंडिया आघाडीत सामील असून लोकसभेच्या तीन जागांची मागणी केली आहे”, असे या आघाडीचे निमंत्रक व शेकापचे चिटणीस मंडळ सदस्य प्रा. एस.व्ही. जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे या आघाडीचे नेतृत्व २६ सदस्यांची समिती करते आहे. ‘स्वराज्य’ पक्षाचे छत्रपती संभाजी राजे आणि ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रकाश आंबेडकर यांनी प्रागतिक आघाडीत यावे, याविषयी बोलणी चालु असल्याचे जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा… निवडणूक प्रचारासाठी बनविले एआय टूल; तरुणाने स्वतःच निवडणुकीत उतरून केली अनोखी जाहीरात
या आघाडीतील पक्षांचे विधानसभेत ७ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामध्ये बविआ ३, समाजवादी २, शेकाप १, माकप १ आणि स्वाभीमानी १ असे आमदार आहेत.आश्चर्य म्हणजे या आघाडीतील बड्या पक्षाचे नेते राजू शेट्टी आणि हितेंद्र ठाकुर यांनी इंडिया आघाडीत सामील नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. परिणामी, भाजपविरोधी ठाम भूमिका घेणारी प्रागतिक आघाडीची सद्यस्थिती इंडिया आघाडीत असून नसल्यासारखी झाली आहे.