अगामी लोकसभा निवडणूक जाहीर व्हायला अवघे काही दिवस बाकी असतानाच समाजवादी पक्षातील महत्त्वाचे नेते पक्ष सोडून जात आहेत. काही दिवसांपूर्वीच पाच वेळा खासदार राहिलेल्या सलीम शेरवानी यांनी समाजवादी पक्षाचा राजीनामा दिला होता. अखिलेश यादव हे पीडीए अर्थातच मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक समुदायाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पक्षातील प्रमुख ओबीसी चेहरा अशी ओळख असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महत्त्वाचे म्हणजे स्वामी प्रसाद मौर्य यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. समाजवादी पक्षात त्यांना अपमानित केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी प्रसाद मौर्य हे स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांनी २०१६ मध्ये बसपातून बाहेर पडल्यानंतर लोकतांत्रिक बहुजन मंच या पक्षाची स्थापना केली होती.

हेही वाचा – ‘सडक पे स्कूल’ अभियान सुरू करणारे दलित नेते, ते हत्या प्रकरणातील दोषी; कोण आहेत मनोज मंझील?

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख बिगर यादव ओबीसी चेहरा अशी ओळख असलेल्या ७० वर्षीय स्वामीप्रसाद मौर्या यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी ते योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यापूर्वी ते जवळपास दोन दशक बहुजन समाज पक्ष आणि भाजपात होते. काही दिवसांपूर्वीच रामचरितमानसबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत ते चर्चेत होते. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकेकाळी बसपाप्रमुख मायावती यांचे अगदी विश्वासू अशी ओळख असलेले मौर्या १९९७, २००२ आणि २००७ मध्ये बसपा सरकारमध्ये मंत्री होते. तसेच काही वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलं. ते बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीसही होते. २०१६ मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्षाचा राजीनामा दिला. मायावती यांनी पक्षाच्या तिकिटासाठी पैसे मागितल्याच्या आरोप त्यांनी केला होता, तर आपल्या मुलांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बसपाचा राजीनामा दिल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.

२०१७ मध्ये त्यांनी लोकतांत्रिक बहुजन मंच नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी मौर्या यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गींसाठी केलेल्या कामामुळे मी प्रभावित झालो असल्याचे ते म्हणाले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पडरौना विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यांनी बसपाच्या जावेद इक्बाल यांचा पराभव केला.

हेही वाचा – पंजाबचे मुख्यमंत्री नव्या भूमिकेत; केंद्र आणि शेतकऱ्यांच्या चर्चेत मध्यस्थ म्हणून भगवंत मान यांची महत्त्वपूर्ण भूमिका

मौर्या यांनी १९९६ साली रायबरेली जिल्ह्यातील दलमाऊ विधानसभा मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या निवडणुकीत त्यांनी बसपाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. मात्र, २००७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना परभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरीही त्यांना बसपाने विधान परिषदेवर पाठवले आणि मंत्री केले. आपल्या राजकीय कारकिर्दीत पाच वेळा आमदार राहिलेल्या मौर्या यांनी गैर-यादव ओबीसी चेहरा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prominent obc face swami prasad maurya quit in samajwadi party likely to float own party spb