छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील भीषण पाणीटंचाईमुळे आता मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्यासाठी ‘जार’ किंवा मोठ्या बाटलीतून पाणी पुरवावे लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०८५ मतदान केंद्रांवर ८० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्णत: आटलेले आहेत. त्यामुळे ज्या भागात टँकरचा स्रोतही वापरता येणार नाही तेथे ४० लिटरच्या पाण्याच्या बाटल्याने पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३६१ गावांसाठी ५६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. केवळ पिण्याचे पाणीच नाही तर उन्हाचा तडाखा लागू नये म्हणून निवारा नसणाऱ्या १० मतदान केंद्रांवर निवारा करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ हजार ८५ मतदान केंद्र आहेत. त्यातील औरंगाबाद लोकसभा मतदान केंद्रात २०४० मतदान केंद्र आहेत. यातील ८० ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधाच नाही. शाळा किंवा अन्य सरकारी बांधकाम असणाऱ्या इमारतीमध्ये पिण्याचे पाणी नसल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ५ मे पर्यंत शाळांमधील टाक्या धुवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर पाण्याचा स्रोत असल्यास त्यातून त्या भरून घ्याव्यात किंवा त्यासाठीही स्वतंत्र टँकर पाठविले जातील. अशी स्थिती लातूर जिल्ह्यातही असल्याचे लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर म्हणाल्या. ‘लातूर जिल्ह्यात फार आवश्यकता नाही. पण १४ ठिकाणी टँकर सुरू आहेत. त्या ठिकाणी आदल्या दिवशी टँकरने पाणी भरून घेतले जाईल, असेही ठाकूर म्हणाल्या. जालना जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी ४० लिटरच्या मोठ्या बाटलीचे पाणी दिले जाणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, ‘बीड आणि गेवराई तालुक्यात टंचाई जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यातील मतदान केंद्रावर टँकरच्या सहाय्याने पाणी देण्याशिवाय पर्याय असणार नाही. तसे नियोजन केले आहे.
हेही वाचा : हिंदुत्ववादी महिला असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?
इंटरनेट सुविधा नसणारे आठ मतदान केंद्र
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर तालुक्यात प्रत्येकी एक तर फुलंब्री तालुक्यात सहा गावांमध्ये इंटरनेट सोय नसल्याने अधिक शक्तीची काही यंत्रणा या गावांमध्ये बसवून मिळावी यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले. सध्या जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या पुढे असल्याने ऊन खूप असेल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय हे प्रशासनासमोरचे आव्हान असणार आहे.
हेही वाचा : पवन खेरा यांनी कर्नाटक लैंगिक शोषण प्रकरणावरून मोदींवर साधला निशाणा
एक जार किती रुपयांत ?
सर्वसाधारणपणे ४० लिटरच्या एका बाटलीची किंमत ३० ते ३५ रुपये आकरली जाते. जारमध्ये पाणी थंड राहते. त्यामुळे शहरातील अनेक व्यावसायिक पाण्याचा जार वापरतात. आता हे जार मतदान केंद्रांवरही दिले जाणार आहेत.
हेही वाचा : एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली एनडीएची साथ; डाव्या पक्षाच्या उमेदवाराला दिला पाठिंबा
ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत, त्या ठिकाणी जारच्या सहाय्याने पाणी दिले जाणार आहे. मतदान केंद्रनिहाय आढावा घेतला असून, ऊन जास्त असल्याने पाणी आणि निवारा याकडे जातीने लक्ष घातले आहे. मतदान केंद्रांवर सोय होईल. टंचाई असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत.
दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर