पुलवामा हल्ल्याबाबतचा मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून देणारे जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पाठिंबा देण्याकरीता आता पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी एकवटले आहेत. मोदी सरकारने तीन कृषी कायदे आणले असताना सत्यपाल मलिक हे मेघालयचे राज्यपाल असतानादेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे कायदे मागे घ्या, असे सांगण्याचे धाडस दाखवले होते. त्यावेळीदेखील शेतकरी नेत्यांनी सत्यपाल मलिक यांना पाठिंबा दर्शविला होता. सत्यपाल मलिक यांनी नुकतेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या तुकडीवर झालेला हल्ला हा सुरक्षा यंत्रणेतील चुकांमुळे झाला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही बाब मांडल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना गप्प बसण्यास सांगतिले.
मोदी सरकारला जे विषय दाबायचे आहेत, त्या विषयांवर सत्यपाल मलिक धाडसी वृत्ती दाखवत बोलत आहेत, याबद्दल पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांच्या गटांनी मलिक यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेत्यांनी देखील मलिक यांच्या वक्तव्याला उचलून धरत मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
आता हरियाणामधील काही खाप पंचायतींनी मलिक यांच्याप्रती ऐक्यभावना व्यक्त करण्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलल्यामुळे मलिक यांना पाठिंबा देण्याची गरज आहे, अशी भावनादेखील या नेत्यांनी बोलून दाखवली आहे. काही खाप नेत्यांनी तर सत्यपाल मलिक यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंजाबचे वरिष्ठ शेतकरी नेते बलबिल सिंह राजेवाल ट्विट करत म्हटले की, सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत धाडसी विधान केले आहे. शेतकरी वर्ग त्यांचे कवचकुंडल आहे. त्यांनी अशीच धाडसी वृत्ती दाखवत राहावी. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.
संयुक्त समाज मोर्चाचे प्रवक्ते अर्शदीप सिंह यांनीही ट्विट करत म्हटले, “जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबतचे सत्य सांगण्यासाठी विलक्षण साहस दाखवले आहे. शेतकरी वर्ग त्यांच्यापाठी ठामपणे उभा आहे. त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडू नयेत. संयुक्त समाज मोर्चा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”
हरियाणामधील शेतकरी नेते आझाद सिंह पलवा यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलन सुरू असताना सत्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. आता शेतकऱ्यांची वेळ आहे, त्यांची बाजू उचलून धरण्याची. शनिवारी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवू.
एप्रिल २०२१ मध्ये, ज्यावेळी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन जोर धरू लागले होते. त्यावेळी मेघालयचे राज्यपाल असलेल्या मलिक यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली. हरियाणाचे अपक्ष आमदार सोमबीर सांगवान यांना लिहिलेल्या पत्रात मलिक म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांना सांगतिले आहे की, शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेऊ नका. त्यांना दाबण्याचा किंवा घाबरविण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका.”
मार्च २०२२ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले तेव्हा खाप पंचायतीने हरियाणातील जिंद येथील कंडेला गावात सभा घेऊन मलिक यांचा सत्कार केला होता. पंजाबी गायक शुबदीप सिंह उर्फ सिद्धू मुसेवाला याचे ‘एसवायएल’ हे गाणे त्याची हत्या होण्याच्या आधी रेकॉर्ड करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच हे गाणे प्रदर्शित झाले. त्यात देखील मलिक यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. “जर वादग्रस्त कृषी कायदे रद्द केले गेले नाहीत, तर त्याचे दूरगामी परिणाम होतील”, असे मलिक यांनी म्हटले होते.