सुजित तांबडे
पुणे : राजकारणामध्ये सहनशीलता संपली की, त्यातून होणारा स्फोट हा राजकारणाची दिशा बदलणारा ठरत आला आहे. पुण्यात सध्या शिस्तप्रिय भाजप आणि शिस्तीच्या नियमांमध्ये अडकलेली काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस उफाळून आल्याने दोन्ही पक्षांची पांघरलेली शिस्तप्रियता पडद्यावर आली आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांना गटबाजीने ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपमध्ये ‘आयारामां’चे प्रस्थ वाढत असल्याने निष्ठावंतांची गळचेपी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे, तर अगोदरच खिळखिळी झालेल्या काँग्रेससला स्वकियांमुळे गटबाजीने आणखी खिंडार पडले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांपुढे आता डागळलेली प्रतिमा सुधारण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी एनडीए चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनसमारंभाच्या निमित्ताने जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसची पुण्यातील पंढरी समजल्या जाणाऱ्या काँग्रेसभवनमध्ये आले असताना, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि रमेश बागवे हे ज्येष्ठ नेते स्वागतासाठी न आल्याने काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. या दोन्ही घटनांद्वारे भाजप आणि काँग्रेसला स्वकियांनीच धडा शिकविण्याचा उडा उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार कुलकर्णी या भाजपच्या निष्ठावंत आणि अनुभवी राजकारणी आहेत. पुणे महापालिकेत काँग्रेसचे वर्चस्व असताना त्या महापालिकेत सलग तीन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.
हेही वाचा >>> एकीकडे ‘घरघर मोदी’चा प्रचार, दुसरीकडे ‘नमो सन्मान’ वर सवाल
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने पहिल्यांदा संधी दिली आणि त्या कोथरुड विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. मात्र, त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोपा मतदार संघ म्हणून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून कुलकर्णी यांच्या मतात खदखद होती. मात्र, पक्षाच्या शिस्तीमुळे त्यांना व्यक्त होता होत नव्हते. त्यांना भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष देण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणाकडे मोर्चा वळवला. दरम्यानच्या काळात आतापर्यंत कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी कायम अग्रेसर राहणारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाटील यांच्याशी जवळीक साधली. त्यामुळे कुलकर्णी यांच्या नाराजीमध्ये आणखी भर पडली. ही नाराजी उफाळून येण्यास दोन घटना कारणीभूत ठरल्या आहेत.
हेही वाचा >>> राज्यात काँग्रेसची पुन्हा यात्रा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्यावेळी कुलकर्णी यांना कार्यक्रमाला जाण्यासाठी साधा पासदेखील देण्यात आला नाही. त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवले गेले. एनडीए चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांचा नामोल्लेखही टाळण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यांनी समाजमाध्यमातून जाहीरपणे पाटील आणि मोहोळ यांच्यावर टीका केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली असली, तरी भाजपची शहरातील अवस्था ही ‘जो बुंद से गयी, वो हौद से नही आती’ अशी झाली आहे.
पुण्यातील काँग्रेसमधील गटबाजी गेल्या वर्षभरापासून सतत उघड होत आली आहे. अरविंद शिंदे यांची गेल्या वर्षी जून महिन्यात प्रभारी शहराध्यपदी नियुक्ती केल्यापासून या गटबाजीला उधाण आले आहे. माजी आमदार रमेश बागवे यांच्याऐवजी शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामुळे नक्की पुण्यातील काँग्रेस कोणाच्या ताब्यात आहे, असा कार्यकर्त्यांनाच प्रश्न पडला आहे. शिंदे यांच्याबरोबर शहरातील तरुण पदाधिकारी आहेत, तर दुसऱ्या गटात बागवे यांच्यासह कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक संजय बालगुडे हे आहेत. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसभवनमध्ये आले असताना बागवे, जोशी, धंगेकर, बालगुडे हे काँग्रेसमध्ये गेले नाहीत. त्यावरून ही गटबाजी टोकाची झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या गटबाजीला रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे निर्माण झाले आहे.