पुणे : पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करताना भाजपने एका निर्णयात अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. जिल्ह्याचे ‘दादा’ अजित पवार हेच असल्याचे अधोरेखित केले, तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगलीचे पालकमंत्री करून पुण्याचा नवा कारभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपविल्याचे सुतोवाच केले. पालकमंत्रीपद पाटील यांना दिले असते, तर आगामी महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा आणि अजितदादा या दोन दादांमधील संघर्ष महायुतीला त्रासदायक ठरण्याच्या शक्यता होती. हा संघर्षही टळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात अडीच वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेले. त्यानंतर पाटील यांनी पवारांनी घेतलेले अनेक निर्णय बदलले. जिल्हा नियोजन समितीमध्येही निधीचे वाटप करताना भाजपच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना झुकते माप दिले होते. त्यामुळे पाटील आणि पवार यांच्यातील संघर्ष पेटला होता. मात्र, अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर पवार यांच्याकडे हे पद पुन्हा आले. त्यानंतर पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीत घेतलेल्या निर्णयांत बदल करून राष्ट्रवादी काँग्रेसला आर्थिक बळ देण्यात सुरुवात केली.

आणखी वाचा-आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद, रायगडमध्ये शिवसैनिकांचा संताप

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपची ताकद वाढली आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांपैकी नऊ ठिकाणी भाजप, आठ जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि एका जागेवर शिवसेना (शिंदे) पक्षाला यश मिळाले. त्यानंतर यावेळी भाजपने पाटील यांना पालकमंत्री देण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, अजित पवार यांनी ताकद पणाला लावल्याने पुन्हा एकदा त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कारभारी पवार हेच असल्याचे सिद्ध झाले.

पाचव्यांदा पालकमंत्री

अजित पवार यांना पहिल्यांदा पालकमंत्री पद हे १९९९ मध्ये मिळाले. त्यानंतर सरकारमध्ये बदल झाले, तरी पवार यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पालकमंत्री पद हे मिळत आले आहे. आतापर्यंत त्यांची पाचवेळा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाने अजित पवार हे ‘राष्ट्रवादी’ला आणखी जोमाने आर्थिक ताकद देऊन पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय चुकीचा, भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी

पुण्याचे नवे कारभारी

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचा कारभारी कोण, असा प्रश्न भाजपपुढे पडला होता. चंद्रकांत पाटील हे पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने आणि यापूर्वी त्यांनी हे पद सांभाळले असल्याने त्यांनाच हे पद देऊन पुण्याच्या कारभाराची सत्ताकेंद्र पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेदेखील मागील काही महिन्यांपासून पुण्याच्या कारभारात सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी पुणे महापालिकेमध्ये बैठक घेऊन पुण्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. वरकरणी खासदार म्हणून त्यांनी ही बैठक घेतली असली, तरी त्या माध्यमातून भाजपने पुण्याचे नवे कारभारी कोण, हे सुतोवाच केले होते. आता पाटील यांना सांगलीचे पालकमंत्रीपद देऊन भाजपने मोहोळ यांचा मार्ग मोकाळा केला आहे. आगामी महापालिका निवडणुका या मोहोळ यांच्या नेतृत्त्वाखाली होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पेच

पालकमंत्री पदाच्या निर्णयानंतर पुणे जिल्हा आणि शहरातील नेतृत्त्वाबाबत तोडगा निघाल्याची चिन्हे असली, तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत महायुतीत पेच निर्माण झाला आहे. या शहरावर अजित पवार यांचे एकेकाळी वर्चस्व होते. मात्र, मागील पाच वर्षांत भाजपच्या हाती सत्ता राहिली आहे. अजित पवार यांचेच जुने सहकारी भाजपमध्ये गेले. त्यामुळे या शहराचा कारभार भाजपच्या ताब्यात आहे. या महापालिकेत अजित पवार यांचीही ताकद आहे. त्यामुळे पिंपरी चिचवडमध्ये आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bjp leadership to be taken over by muralidhar mohol instead of chandrakant patil print politics news mrj