पुणे : भोरचे काँग्रेसचे माजी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच पुणे जिल्ह्यातून काँग्रेस नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.आमदार संग्राम थोपटे हे भाजपनिवासी झाल्याने जिल्ह्यातील उरलीसुरल्या काँग्रेसची पायामुळे उखडली गेली आहेत. थोपटे यांना पक्षात घेऊन काँग्रेसला भुईसपाट करण्याबरोबरच भाजपच्या ‘मिशन बारामती’ला पुन्हा जोर धरला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद आहे. भाजपने मागील लोकसभा निवडणुकीपासून ‘मिशन बारामती’चा निर्धार केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीत सभा घेऊनही भाजपला यश आले नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात २०१९ मध्ये भाजपने कॅचन कुल यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांना यश आले नाही. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांंच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. तरीही भाजप बारामतीवर कब्जा करू शकली नाही. ‘मिशन बारामती’त भोर विधानसभा मतदार संघ हा कायम भाजपला अडसर ठरत आला आहे.

थोपटे कुटुंब आणि पवार कुटुंबाच राजकीय वैर असले, तरी निवडणुकीत थोपटे कुटुंब हे कायम काँग्रेस किंवा काँग्रेसने आघाडी दिलेल्या उमेदवाराला साथ केली आहे. प्रत्येक निवडणुकीत पवार कुुटुंबातील उमेदवाराला थोपटे यांच्याकडून साथ मिळत गेली असल्याने भाजपला ‘मिशन बारामती’ फत्ते करता आलेली नाही. या लोकसभा निवडणुकीतही भोरमुळे खासदार सुळ यांचे मताधिक्य वाढले. त्यामुळे भाजपने थोपटे यांंची कोंडी करण्याची व्यूहरचना आखली. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी थोपटे यांंच्या विरोधात कुलदीप कोंडे आणि भाजपचे पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक किरण दगडे हे दोन अपक्ष उमेदवार उभे केले. त्यांनी प्रत्येकी २६ हजार आणि २५ हजार मते घेतल्याने थोपटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शंकर मांडेकर हे नवखे उमेदवार निवडून आले. त्यानंतर अनेक दिवस थोपटे हे अज्ञातवासात होते. शिवाय त्यांंचा राजगड सहकारी साखर कारखाना हा आर्थिक अडचणीत सापडला. त्यांना राज्य सरकारकडून मदतीचा हात पुढे करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काहीही मदत करण्यात आली नाही. ही नामी संधी साधून भाजपने थोपटे यांना हेरले आणि अखेर त्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडले आहे. त्यामाध्यमातून आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांंमध्ये यश मिळविण्याबरोबरच भाजपच्या ‘मिशन बारामती’ला पुन्हा जोर धरला आहे.

थोपटे घराण्याने ५५ वर्षांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला

भोरमधील थोपटे घराणे हे काँग्रेसचे कट्टर म्हणून ओळखले जाते. १९७२ मध्ये अनंतराव थोपटे हे पहिल्यांदा भोर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले. १९८० पासून ते १९९५ पर्यंत सलग चारवेळा ते काँग्रेसकडून निवडून आले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली होती. सोनिया गांधी यांनी त्यांंच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. मात्र, शरद पवार यांनी काशिनाथ खुटवड यांना निवडून आणल्याने थोपटे यांंचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले. पवार आणि थोपटे कुटुंबामध्ये राजकीय वैर निर्माण झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत थोपटे हे पुन्हा निवडून आले. मात्र, त्यानंत वयोमानामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर झाले. त्यांनी चिरंजीव माजी आमदार संग्राम थोपटे यांना २००९ च्या निवडणुकीत उभे केले. सलग तीनवेळा संग्राम हे निवडून आले. या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे तब्बल २५ वर्षांनी थोपटे यांच्या घरी गेले आणि राजकीय कटूता दूर झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदार सुळे यांना भोरमधूल चांगलीच साथ मिळाली. मात्र, आता थोपटे घराण्याने ५५ वर्षांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune by inducting sangram thopte bjp boosts mission baramati and aims to weaken congress print politics news sud 02