पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील पक्षाचा पराभव, ब्राह्मण मतदारांकडून होत असलेली टीका, संघ वर्तुळातूनही मिळालेल्या कामपिचक्या यामुळे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षासाठी कोथरूड मतदार संघ हा पुणे शहरातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याने विधानसभेच्या मागील निवडणुकीत माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांना तेथे उमेदवारी देण्यात आली. त्या जागेवर त्यापूर्वी निवडून आलेल्या मेधा कुलकर्णी यांना डावलून दिलेल्या या उमेदवारीने पक्षांतर्गत पातळीवरही असंतोष निर्माण झाला होता. मात्र पक्षाच्या आदेशामुळे पाटील यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना काम करणे भाग पडले.
हेही वाचा : नितीश कुमार भाजपाबरोबर नव्या कपड्यांत; ‘धर्मनिरपेक्षते’च्या भूमिकेत बदल होणार का?
गेल्या पाच वर्षांत कुलकर्णी यांनी पक्षात राहूनच आपला असंतोष विविध प्रकारे व्यक्त केला होता. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देताना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्यामुळे तेथील कार्यकर्त्यांमध्ये चिडचिड निर्माण झाली होती. आता त्यांना ाराज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने एकाचवेळी अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळेल किंवा नाही, याबाबत अद्याप संभ्रम असला, तरी तेथील इच्छुक मेधा कुलकर्णी यांचा त्या जागेवरील हक्क आता संपुष्टात येईल. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पक्षांतर्गत बंडाळी शमण्याची शक्यता निर्माण होईल. तसेच लोकसभेला ब्राह्मण उमेदवारच देण्याचा हट्ट काही प्रमाणात कमी होऊ शकेल. विधानसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात कोणताही दगाफटका होऊ नये, असाही प्रयत्न या उमेदवारीमागे आहे. मेधा कुलकर्णी यांचा मतदारसंघात आणि पक्षातील प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षात झाले, चांदणी चौकातील नव्या रस्ता योजनेच्या उद्घाटनप्रसंगी प्रथमच मेधा कुलकर्णी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद जाहीरपणे उघड झाली. अगदी ऐनवेळी त्यांना कार्यक्रमस्थळी येण्याची विनंती करून पक्षाच्या नेतृत्वाने वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही केला. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी यांना पक्षाच्या वतीने काही पद मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती.
हेही वाचा : सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, पण इंडिया आघाडीचे भवितव्य काय?
कसबा विधानसभा निवडणुकीत हेमंत रासने यांचा झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी पुण्यात तळ ठोकूनही अपयश पदरी पडल्याने त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर पडता कामा नये, या दृष्टीने मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी ही एक प्रकारची मलमपट्टी असल्याचे मानले जाते. पुणे शहरातून गेली अनेक वर्षे सातत्याने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील खासदार लाभले आहेत. अनंतराव पाटील, जयंतराव टिळक, विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या अनेकांनी पुण्याचे नेतृत्व केले आहे.