पुणे : ‘घोडा हत्याराची भाषा माझ्याकडे नाही. मी थेट कापतो… बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार देश चालतो मग महापालिकेत खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कामे करावे. त्यांची खुर्ची खेचायला वेळ लागणार नाही… अधिकाऱ्यांना कळायला हवे की, ते त्या खुर्चीवर का बसले आहेत. आम्ही कायदा हातात घेतला तर अधिकारी सुजून बाहेर पडतील’….ही मुक्ताफळे आमदार नितेश राणे उधळल्याने पुणे महापालिकेतील अधिकारी आणि राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. राणे यांनी अधिकाऱ्यांना दम देतानाच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केल्याने हा संघर्ष आणखी पेटणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संघर्षाला पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर झालेले अतिक्रमण कारणीभूत ठरले आहे. बांधकामास बंदी असतानाही पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करून पुण्येश्वर निर्माण समितीतर्फे पुणे महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व करताना आमदार नितेश राणे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी आणि वैयक्तिक पातळीवर केलेली टीका यामुळे आमदार विरोधात अधिकारी असा संघर्ष झाला. नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दम देतानाच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही सुरू झाली आहे.

हेही वाचा : उदयनिधींची पाठराखण केल्यानंतर प्रियांक खरगे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “जो धर्म…”

‘बाबरीची एक वीट पाडावी, अशी माझी इच्छा होती. पण त्यावेळी शक्य झाले नाही. आता पुणे महापालिका प्रशासन मला ती संधी देईल. यावेळी आपल्यावर खटले दाखल होणार नाहीत. कारण सरकार आपले आहे. आम्ही काही केले तरी खटले दाखल होणार नाही. ज्या दिवशी तारीख जाहीर होईल, त्यादिवशी कोणालाही दूरध्वनी करायचा नाही. विचारायचे नाही. थेट कार्यक्रम करायचा. विक्रम कुमार तुम्ही माझ्या जंगलातून इथे आलात. आता यापुढे फक्त तारीख जाहीर होईल. कोणीही धार्मिक स्थळाकडे वाकड्या नजरेने पाहिले तर दोन पायावर जाणार नाही’ अशी विधाने आमदार राणे यांनी करत अधिकाऱ्यांना मारहाण करण्याची तसेच दमदाटीची भाषा केली.

हेही वाचा : केंद्रानंतर आता उत्तर प्रदेश सरकारही बोलावणार विशेष अधिवेशन, महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता!

एवढ्यावरच न थांबता राणे यांनी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनात जाऊन थेट धमकीच दिली. या प्रकारानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत राणे यांना जशास तसे उत्तर दिले. राणे यांनी अधिकाऱ्यांना धमक्या देऊ नयेत. नागरिकांच्या हितासाठी अधिकारी कामे करतात. त्यामुळे नेत्यांची दादागिरी येथे चालणार नाही. शब्द जपून वापरा, अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले तर काय होईल हे पहा, असा इशाराच अधिकाऱ्यांनी एकत्रित येत राणे यांना दिल्याने हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

हेही वाचा : कसब्याच्या पराभवाचा भाजपने घेतला धसका, पुण्यात बैठकांचा सपाटा; पुढील आठवड्यात रा. स्व. संघाची महत्त्वाची बैठक

देशात ८० टक्के हिंदू रहातात, मग अधिकारी कशासाठी जिहादी लोकांचे लाड करतात, असे वक्तव्य राणे यांनी केल्याने मुस्लिम संघटनांनीही आक्षेप घेतला आहे. राणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली असून गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुणेश्वर मंदिरावरून सुरू झालेला हा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation officials united against bjp mla nitesh rane politics print news css
Show comments