सुजित तांबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ही आगामी महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तयारीला लागली असून, अन्य पक्षांतील नाराज किंवा उमेदवारी मिळण्याची शाश्वती नसलेल्यांशी संवाद सुरू केला आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे ) ‘मोठे मासे’ त्यांच्या गळाला लागले असून, डिसेंबरअखेर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवसेना भवनाच्या उद्घाटन समारंभानंतर होणाऱ्या मेळाव्यामध्ये संबंधितांचे पक्षप्रवेश होणार आहेत.

हेही वाचा >>> महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीविराेधात मनविसेचा नवा अजेंडा; अमित ठाकरेंचा दौरा तरुणाईत चर्चेत

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाचे अधिकृत नामकरण झाल्यानंतर पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांची प्रक्रिया बहुतांश पूर्ण झाली आहे. शहरप्रमुखांबरोबच उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेना प्रमुख, महिला आघाडी प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. शाखानिहाय नेमणुकांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. पदाधिकारी नेमणुकांचे काम होत आल्याने आता पक्ष मजबुतीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे ‘मोठे मासे’ हे ‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या गळाला लागले आहेत.

हेही वाचा >>> पक्षांतर्गत कोंडीमुळे अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडले….

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकजण तयारीला लागले आहेत. या निवडणुकांपूर्वी भाजपशी युती होण्याची अपेक्षा मनसेच्या इच्छुकांना होती. मात्र, बाळासाहेबांची शिवसेनेबरोबर भाजप जोडली गेल्यामुळे मनसेतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी कोथरुड, पर्वती आणि कोरेगाव पार्क या भागांतील मनसेच्या माजी नगरसेवकांना भाजपबरोबर युती होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता ही शक्यता धुसर झाल्यामुळे संबंधित भागांतील माजी नगरसेवकांना बाळासाहेबांची शिवसेना हा पुन्हा महापालिकेत जाण्याचा योग्य पर्याय वाटत आहे. त्यामुळे मनसेचे अनेक ‘मोठे मासे’ हे बाळासाहेबांची शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाऊन भाजपच्या साथीने निवडून येण्याचे मनसुबे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आजी आणि माजी नगरसेवकांनी रचले आहेत. या पक्षातील अनेकजण बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा >>> मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत बच्चू कडू राजकीयदृष्ट्या हतबल

काँग्रेसमधीलही काहीजण प्रवेशाच्या तयारीत आहेत. मात्र, पुण्यातील काँग्रेसची स्थिती पाहता त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला कितपत लाभ होईल, याबाबत बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये साशंकता आहे.

याबाबत बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, ‘पक्षांतर्गत नेमणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त शाखानिहाय नेमणुका करणे शिल्लक आहेत. येत्या १५ दिवसांत या नेमणुका पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यानंतर पक्षबांधणीसाठी सुरुवात होणार आहे. सध्या मनसेचा मोठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहीजण येण्याच्या तयारीत आहेत. सारसबाग येथे शिवसेना भवन बांधण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरअखरे हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा घेतला जाणार आहे. त्या मेळाव्यामध्ये संबंधितांचे पक्षप्रवेश होणार आहेत.

जुन्यांना न्याय; नव्यांचा सन्मान

अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देताना जुन्यांना न्याय आणि नव्यांचा सन्मान होईल, अशी भूमिका बाळासाहेबांची शिवसेनेने घेतली आहे. याबाबत शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले ‘पक्षप्रवेश करण्यापूर्वी जुन्या पदाधिकाऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर नव्याने पक्षात येणाऱ्यांना अपेक्षा असणार आहे. त्यांचाही सन्मान होईल, या पद्धतीने नियोजन केले जाणार आहे.’

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ncp and mns key leaders likely to join eknath shinde led balasaheb s shiv sena party print politics news zws