पुणे : पुण्यातील शिवसेनेची धगधगती ‘मशाल’ विझविण्याची, तर ‘धनुष्यबाणा’चाच अचूक वेध घेण्याची दुहेरी खेळी खेळण्यास भाजपने सुरू केल्याने दोन्ही शिवसेनेमध्ये अवस्थता पसरली आहे. भाजपने पाच माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का दिला असताना त्याच नगरसेवकांच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे) पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा डाव साधल्याने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच पुण्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षात ठिणगी पडली आहे.
पुण्यात एकेकाळी २० नगरसेवक आणि राजकारणातील ‘पुणे पॅटर्न’च्या माध्यमातून महापालिकेत सत्ता अशी भक्कम स्थिती असलेल्या शिवसेनेचे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत अवघे दहा नगरसेवक निवडून आले. त्या नगरसेवकांपैकी अविनाश साळवे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच घरवापसी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेना दुभंगल्यावर नाना भानगिरे हे एकच माजी नगरसेवक शिवसेना (शिंदे) पक्षाकडे गेले. उर्वरित आठ जण आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. मात्र, त्यापैकी विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट आणि , संगीता ठोसर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांंची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचे वक्तव्य केल्याने शिवसेना (शिंदे) पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पाच माजी नगरसेवकांचे तोंड बंद करावे, अशी सूचना केल्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षात ठिणगी पडली आहे.
हेही वाचा : दोन हजार कोटींचा निधी द्या, काँग्रेसची अजितदादांकडे मागणी!
शिवसेना ठाकरे पक्षाकडे आता माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार यांंचे चिरंजीव माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संंजय भोसले आणि श्वेता चव्हाण हे तीनच शिलेदार राहिले आहेत. त्यांना गळाला लावण्यासाठीही भाजपकडून प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज सुतार हे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांंच्याविरोधात निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना डावलून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी मिळाल्याने सुतार हे नाराज झाले. सुतार, येरवडा भागात शिवसेनेचे अस्तित्व टिकवून असलेले संंजय भोसले आणि श्वेता चव्हाण यांंच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे पक्ष सध्या तग धरून आहे.
भाजपमध्ये नाराजी?
शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर भाजपमध्येही अंतर्गत नाराजी पसरली असल्याचे सांगण्यात येते. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे नगरसेवक भाजपनिवासी झाले आहेत. त्यापैकी धनवडे आणि जावळे हे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा मतदार संघातील माजी नगरसेवक आहेत. धनवडे यांनी भाजपचे पप्पू कोठारी आणि जावळे यांनी अपक्ष छाया वारभुवन यांंना पराभूत केले होते. आता ते भाजपमध्ये आल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबतची फलकबाजीही सुरू झाली आहे. बाळा ओसवाल हे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांंनी गेल्या निवडणुकीत भाजपचे गौरव घुले यांंचा पराभव केला होता.
हेही वाचा : टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
संगीता ठोसर या कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागातून अवघ्या १८१ मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांंच्यामुळे भाजपच्या सुवर्णा मारकड यांंचा पराभव झाला होता. आगामी महापालिका निवडणुकीत हे पाचजण उमेदवारीसाठी दावेदार असल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना हा निर्णय पचनी पडलेला नाही. त्यांंच्याकडून अंतर्गत नाराजी सुरू झाली असल्याची चर्चा आहे.