या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या येथे काँग्रेसची सत्ता असून मुख्यमंत्रीपद अशोक गेहलोत यांच्याकडे आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करून सत्ता कायम राखण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जाणार आहे. तर काँग्रेसला धूळ चारत या राज्यात भाजपाचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न भाजपा करणार आहे. येते भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान राजस्थानमधील शीख समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आपल्या पंजाबच्या काही नेत्यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत.
काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
पंजाबसह हरियाणा, दिल्ली, गुजरात या राज्यातील काही नेते राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. राजस्थानच्या सर्व २०० जागांवर काँग्रेस पक्ष बळकट व्हावा यासाठी हे नेते धडाडीने प्रचार करणार आहेत. राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी तशी माहिती दिली आहे.
रंधावा हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या या योजनेबद्दल सविस्तर सांगितले आहे. “राजस्थानमधील शीख समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा पंजाबचे नेते प्रयत्न करतील. गंगानगर आणि हनुमानगड या जिल्ह्यांसह अलवर, कोटा, बुंदी आणि अजमेर या प्रदेशांतही शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागांवरही पंजाबमधील नेत लक्ष देतील,” असे रंधावा यांनी सांगितले.
शीख समुदायाला काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न
पंजाबमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी या मोहिमेला केल्या काही महिन्यांपूर्वीच सुरुवात केलेली आहे. संबंधित जिल्ह्यांत काँग्रेसची काय स्थिती आहे? हे जाणून घेण्यासाठी पंजाबचे काही नेते राजस्थानचा सातत्याने दौरा करत आहेत. काँग्रेसच्या गुरदासपूर येथील आमदार बरिंदरमित सिंग पहारा यांच्यावर गंगानगर आणि हनुमानगड या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांत शीख समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे पहारा यांच्याकडे शीख समुदायाचे मत काँग्रेसकडे वळण्याचे मोठे आव्हान असणार आहे. या कामासाठी माजी आमदार दविंदर सिंग घुबैया आणि काँग्रेसचे माजी जिल्हा प्रमुख भगवंतपालसिंग सच्चर हे पहारा यांच्या मदतीला असणार आहेत.
राजस्थानमध्ये शीख समुदायाचे प्रमाण किती?
२०११ च्या जनगणनेनुसार गंगानगर या जिल्ह्यात एकूण ४.७४ लाख तर हनुमानगड या जिल्ह्यात एकूण २.१७ लाख शीख नागरिक आहेत. अलवर जिल्ह्यात ६४ हजारपेक्षा अधिक शीख लोक आहेत. हेच प्रमाण बिकानेर येथे २० हजार, जयपूर येथे १७ हजारपेक्षा अधिक, बुंडी आणि कोटा येथे प्रत्येकी ११ हजार, अजमेर येथे ४ हजार, जोधपूर येथे ३ हजार शीख समुदाय आहे.
स्थानिक नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी दौरा
पहारा यांनी काँग्रेसच्या या मोहिमेविषयी आणि त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या मतदारसंघातील काँग्रेसच्या स्थितीविषयी सांगितले आहे. “संघटनात्मक पातळीवर अनेक बदल करण्यात आले आहेत. मी ज्या भागांना भेट दिलेली आहे, तेथे काही बदल करण्याची सूचना केलेली आहे. मी सांगितलेल्या बदलांना काँग्रेस पक्षाने विचारात घेतले आहे,” असेही पहारा यांनी सांगितले. दविंदर सिंग घुबैया यांनीदेखील गंगानगर आणि हनुमानगड येथे राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट नसल्याचा दावा केला. घुबैया यांच्या या दोन जिल्ह्यांच्या भेटीबद्दल रंधावा यांनी प्रतिक्रिया दिली. “स्थानिक नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी काँग्रेसकडून ही मोहीम राबवली जात आहे. जशी निवडणूक जवळ येईल, तसे पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांतून काँग्रेसचे आणखी नेते पंजाबमध्ये येतील,” असे रंधावा म्हणाले.
अन्य आमदारांनाही राजस्थानामध्ये दौरा करण्याचा आदेश
असे असले तरी काँग्रेसचे नेते अन्य राज्यांतून राजस्थानमधून कधी येणार हे रंधावा यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र जे नेते पूर्ण क्षमतेने काम करण्यास तयार आहेत, अशांवरच ही जाबबदारी सोपवली जाणार आहे. फक्त नावाला काम करणाऱ्यांना कोणतीही जबाबदारी दिली जाणार नाही, असेही रंधावा यांनी स्पष्ट केले आहे. पहारा यांच्या व्यतिरिक्त, फतेहगड चुरियान मतदारसंघाचे आमदार तिृप्त राजिंदर सिंग बाजवा आणि राजासांसीचे आमदार सुखबिंदर सिंग सुख सरकारिया यांना अन्य दोन इतर जिल्ह्यांचा दौरा करण्याचे सांगण्यात आले होते.