एकीकडे गेल्या काही दिवसांपासून पंजाबमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चाही सुरू आहे. अशातच या आंदोलनादरम्यान शुक्रवारी एका २२ वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये संतापाची लाट आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता पंजाबमधील भाजपा नेत्यांनीही मौन सोडले असून त्यांनी भारतीय जनता पक्ष आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटलं आहे.
हेही वाचा – मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!
हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान एका २२ वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शुभकरन सिंग असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्या या मृत्यूनंतर भाजपाचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी या घटनेबाबत दुख: व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही केली आहे. ”मी या घटनेने अत्यंत दु:खी झालो आहे. या घटनेची पुरनावृत्ती होऊ नये, यासाठी दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले. याशिवाय सरकार आणि सुरक्षा दलांनी संयम बाळगणे आवश्यक आहे, असं म्हणत त्यांनी हरियाणा सरकारवरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटना आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चौथ्या फेरीच्या चर्चेपूर्वी जाखड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांच्याशी चर्चा केल्याचंही सांगितलं जात आहे. जाखड यांच्या शिवाय काही दिवसांपूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनीही शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असल्याचे ते म्हणाले होते.
योगायोग म्हणजे सुनील जाखड आणि अमरिंदर सिंग हे दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते. २०२० मध्ये कृषी कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनात दोघांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच मोदी सरकारविरोधात आंदोलनही केले होते.
हेही वाचा – अखिलेश यादव मुस्लीम शब्द का उच्चारत नाहीत? असा सवाल करत सपा नेत्याचा राजीनामा
शेतकरी आंदोलनाच्या सहा दिवसांनंतर पहिल्यांदाच पंजाबमधील भाजपाच्या नेत्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत बोलावं या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी संघटनाकडून या नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना जाखड म्हणाले, ”शेतकरी संकटात असून मी त्यांच्या भावना समजू शकतो. त्यांना माझ्या घरासमोर आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे”. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांना स्वच्छतागृहाचा वापर करता यावा यासाठी आपल्या घराचे दरवाजेदेखील उघडे केले आहेत.