Bhagwant Mann Australia Trip : पंजाब सध्या शेतकरी आंदोलन आणि राज्यात नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे चर्चेत आहे. अशात मुख्यमंत्री भगवंत मान खासगी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाल्यामुळे ते विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. भगवंत मान मंगळवारी संध्याकाळी त्यांची पत्नी डॉ. गुरप्रीत कौर, त्यांचे सुरक्षा प्रमुख एके पांडे आणि अतिरिक्त प्रधान सचिव वरजीत वालिया यांच्यासह ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मायदेशात परतण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवंत मान ऑस्ट्रेलियाला खासगी दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान भगवंत मान यांच्यासोबत राज्याच्या क्रीडा विभागाचे काही अधिकारीही गेल्याने ते २८ डिसेंबर रोजी मेलबर्न येथे होणारा प्रो कबड्डी लीगचा सामना पाहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर ते भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामनाही पाहणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची माहिती समोर येताच विरोधकांनी, राज्य पेटलेले असताना सुट्ट्या कशा काय घेत आहात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्याचा…

मान यांना लक्ष्य करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा म्हणाले, “राज्य सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यातून जात आहे. सीमावर्ती जिल्हे अलिकडेच बॉम्बस्फोटांमुळे हादरले आहेत. ज्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे हे, उघड झाले आहे.” दरम्यान पंजाबमध्ये २३ नोव्हेंबरपासून तब्बल आठ स्फोट झाले आहेत. यापैकी चार अमृतसरमध्ये, तीन गुरुदासपूरमध्ये आणि एक बॉम्बस्फोट नवनशहरमध्ये घडला.

मान यांच्यावर टीका करताना पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी येथे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाचा मुद्दाही बाजवा यांनी उपस्थित केला.

“डल्लेवाल यांच्या उपोषणाला ३० दिवस झाले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पंजाबमधील मंडी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला आहे. कृषी विपणन विषयक नवीन मसुदा राष्ट्रीय धोरण आराखड्याद्वारे तीन शेतकरी विरोधी कायद्यातील काही कलमे परत आणली आहेत. अशा परिस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री ऑस्ट्रेलियात क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्याचा विचारही कसा करू शकतात?” असा सवाल बाजवा यांनी केला.

आणीबाणीसारखी परिस्थीती

पंजाबचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुनील कुमार जाखड यांनीही भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “मान यांनी अशा वेळी पंजाब सोडले आहे जेव्हा राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे “आणीबाणीसारखी परिस्थिती” निर्माण झाली आहे.”

हे ही वाचा : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी-अल्लू अर्जुनच्या वादात बीआरएस पक्षाला नवसंजीवनी; राजकारणात पुनरागमन कसे केले?

शहीदी पंधरवढा

दुसरीकडे शिरोमणी अकाली दलानेही मुख्यमंत्री भगवंत मान शहीदी पंधरवड्यात ऑस्ट्रेलियाला गेल्याने त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. दर डिसेंबरमध्ये, शीख लोक त्यांचे १० वे गुरू, गुरु गोविंद सिंग यांच्या चार पुत्रांनी आणि आईने केलेल्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन म्हणून पंजाबमधील चमकौर साहिब आणि फतेहगढ साहिब येथे शहीदी मेळा किंवा शहीदी सभा साजरा करतात. ज्यात लाखो लोक सहभागी होतात.

दरम्यान आम आदमी पार्टीने राज्यातील विरोधकांच्या या टीकेला अद्याप कोणतेही अधिकृत्त उत्तर दिलेले नाही. पण, त्यांच्या एका नेत्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की “मुख्यमंत्री परदेशात जाण्यात काहीही चुकीचे नाही”.

मुख्यमंत्री माणून नाहीत का?

ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासोबत वेळ का घालवू शकत नाहीत? ते माणूस नाहीत का? यामध्ये काही गैर असते तर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांना रोखले असते. ते दोघे दिल्लीत एका बैठकीत एकत्र होते.”

गेल्या काही काळात पंजाबमधील मंत्रिमंडळाच्या बैठकाही कमी झाल्यामुळे मान यांच्या परदेश दौऱ्यावर टीका होत आहे. लोकसभा निवडणुका आणि अनेक पोटनिवडणुकांव्यतिरिक्त पंजाबमध्ये या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही झाल्या आहेत. या वर्षी मान सरकारने केवळ पाच मंत्रिमंडळ बैठका घेतल्या. राज्यात सुमारे सहा महिने आदर्श आचारसंहिता असल्याने मंत्रिमंडळ निर्णय घेता आले नाहीत. २१ डिसेंबर रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील आचारसंहीत मंगळवारी संपली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab cm bhagwant mann faces opposition backlash over australia trip aam