राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. पंजाबचा कारभार तुम्ही दिल्लीच्या रिमोटवर चालवू नका असा खोचक सल्ला देत राहुल गांधी यांनी भगवंत मान यांच्यावर भाष्य करत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. अशात आता भगवंत मान यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हटलं होतं राहुल गांधी यांनी?
“मी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना सांगू इच्छितो की त्यांनी पंजाबचा कारभार हा पंजाबमधून चालवावा. दिल्लीतून नाही. भारतातल्या प्रत्येक राज्याला एक इतिहास आहे. प्रत्येक राज्याची एक भाषा असते. पंजाबचीही तशीच भाषा आहे. त्यामुळे पंजाबचा राज्य कारभार जरूर करा पण तो दिल्लीच्या सांगण्यावरून नाही. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दबावात येऊन काम करू नये. हा पंजाबच्या प्रतिष्ठेचा आणि पंजाबच्या इतिहासाचा प्रश्न आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतंत्रपणे कारभार करावा कुणाच्या दडणपाखाली येऊन नाही ” असं राहुल गांधी यांनी होशियारपूरमधल्या भाषणात म्हटलं होतं.
राहुल गांधी यांनी हे जे भाष्य केलं यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. भगवंत मान यांनी पंजाबी भाषेत ट्विट करत राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलं आहे भगवंत मान यांनी ?
राहुल गांधी जे बोलले ते थेट बोलले नाहीत हेच बरं झालं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंजाबमध्ये आधी जे चन्नी सरकार होतं त्या चन्नी यांना तुम्ही मुख्यमंत्री केलं होतं पण मला जनतेने मुख्यमंत्री केलं आहे. असं म्हणत राहुल गांधी यांना भगवंत मान यांनी टोला लगावला आहे.
पंजाबमधली सद्यस्थिती काय आहे?
पंजाबमध्ये आप या पक्षाचं सरकार आलं आहे. मात्र भगवंत मान हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना, शेतकरी आंदोलनं, आयएएस अधिकारी निलीमा आणि पीसीएस अधिकारी एन. एस. धालीवाल यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले जाणं या घटना घडल्या आहेत. वर्षी मार्च महिन्याच्या १४ तारखेला पंजामध्ये कबड्डी मैदानावर कबड्डीपटू संदीप सिंग नांग यांची हत्या करण्यात आली.त्याचा तपास कुठपर्यंत आला हे अद्याप पंजाब सरकारने स्पष्ट केलेलं नाही. आप सरकार निवडून आल्यानंतर मे महिन्यात पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सहा शूटर्सनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या केली. या सगळ्या घटनांच्या बाबतीतही सरकार विशेष काही पावलं किंवा ठोस निर्णय घेत नसल्याचं दिसतं आहे. या सगळ्यावरून विरोधक सरकारला घेरत आहेत. अशात राहुल गांधी यांनी होशियारपूरमध्ये भगवंत मान सरकार रिमोटवर चालणारं सरकार आहे असं म्हटलं होतं. त्यावर आता भगवंत मान यांनी उत्तर दिलं आहे.