Lawrence Bishnoi News: गेल्या काही वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई हे नाव देशाच्याच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे. लॉरेन्स बिश्नोईनं सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरू झालेली चर्चा काही काळानंतर थंडावली. पण बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. कॅनडानं बिश्नोईचं नाव घेऊन भारत सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवाय, बिश्नोई तुरुंगात असूनही त्याच्याबाबत एवढी चर्चा होत असल्यामुळे त्याचं नाव घराघरात परिचित होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
कॅनडानं हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानवादी फुटीर नेत्याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगची मदत घेतल्याचा दावाही कॅनडा सरकारनं केला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण आणि दुसरीकडे बाबा सिद्दिकींची हत्या यानंतर हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईचं कनेक्शन अधोरेखित होऊ लागलं आहे. त्यावरून भारताच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क होऊ लागले असून काँग्रेसनं याबाबत भूमिका मांडली आहे.
लॉरेन्स बिश्नोईवरून राजकीय वाद!
भारत सरकारनं कॅनडा सरकारचे आरोप फेटाळले असले, तरी काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष व लुधियाना लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी यावरून शंका उपस्थित केली आहे. कॅनडाचे आरोप हा गंभीर मुद्दा असून या सर्व प्रकरणाचे धागेदोरे तुरुंगात असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईपर्यंत जात असल्याचं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं आहे.
कॅनडाच्या आरोपांवर मांडली भूमिका…
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारणा केली असता अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. “मी खलिस्तान समर्थक नाही. मी एक सच्चा हिंदुस्थानी आहे. पण कॅनडाने केलेले हे आरोप गांभीर्याने घेण्याचा मुद्दा आहे. जसजशा दिवसेंदिवस नवनव्या गोष्टी उघड होत आहेत, तसतसं लोकांचा आता विश्वास बसू लागला आहे की सरकारी यंत्रणा व बिश्नोई यांच्यात काहीतरी शिजतंय”, असं अमरिंदर सिंग म्हणाले.
“असं वाटण्यामागे कारण आहे. बिश्नोई तुरुंगात असतानाही त्याच्या मुलाखती चॅनल्सवर दाखवल्या जात आहेत. तिकडे त्याच्या गँगचे साथीदार गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत आहेत. हे सगळं घडत असताना बिश्नोईला हिंदूस्थानी व गोभक्त म्हणून दाखवलं जात होतं तर सिद्धू मूसेवालाची प्रतिमा मलीन केली जात होती”, असंही अमरिंदर सिंग यांनी नमूद केलं.
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिष्णोई सलमान खानच्या मागे हात धुवून का लागलाय? वाचा २६ वर्षांचा घटनाक्रम
बाबा सिद्दिकींच्या हत्येमध्ये पुन्हा बिश्नोईचं नाव!
दरम्यान, “बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर तिकडे लॉरेन्स बिश्नोई तुरुंग त्याचं घर असल्याप्रमाणे राहात आहे. तो तुरुंगात बंद असूनही कॅनडा व अमेरिकादेखील त्याच्या नावाची चर्चा करत असल्याचं ऐकून त्याला मोठा गर्व वाटत असेल”, असंही अमरिंदर सिंग म्हणाले. “बिश्नोई तुरुंगात ब्रँडेड कपडे घालतो आणि दुसरीकडे गरीब तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करतो आहे. पण सरकारला यावर काहीही करायचं नाहीये”, असा आक्षेप त्यांनी घेतला.
लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत पंजाबमध्ये झाल्याचं वृत्त राज्य सरकारने फेटाळून लावलं आहे. पण पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने याची दखल घेतल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. पण त्यानंतरही संबंधित तुरुंगातील पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.