२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी ‘INDIA’ नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत एकूण २६ पक्ष आहेत. यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) या पक्षांचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावर हे पक्ष एकत्र आले असले तरी पंजाबमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांचे प्रखर विरोधक आहेत. केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यास समहती दर्शवली आहे. पंजाबमध्ये मात्र राज्य पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांचा एकत्र लढण्यास नकार आहे. ही नाराजी आता पंजाब काँग्रेसमधील नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.
“इच्छा नसताना लग्न करून दिले तर…”
पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वाने आप पक्षाशी युती करण्यास नापसंती व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब युवक काँग्रेसतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांनी आगामी लोकसभा निवडणूक आणि आप पक्षाशी युती करण्यासंदर्भात भाष्य केले. “पंजाबमधील काँग्रेसच्या नेत्यांना या नव्या पक्षातील नेत्यांचे तोंड पाहायचे नाही. इच्छा नसताना लग्न करून दिले जात असेल तर ते लग्न दोन्ही कुटुंबांसाठी डोकेदुखीचं कारण ठरतं. आमच्या पक्षातील नेत्यांना आप पक्षाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचे नाहीत,” असे प्रतापसिंग बाजवा म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तुलना अडॉल्फ हिटलरशी केली. या कार्यक्रमात बाजवा यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवस बी. व्ही यांच्याकडे पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या भावना वरिष्ठांना कळवाव्यात अशी विनंतीही केली.
“केंद्रीय नेतृत्व मत विचारात घेईल, अशी अपेक्षा”
याआधीही जून महिन्यात विरोधकांची आघाडी स्थापन झाल्यानंतर बाजवा यांनी दिल्लीला जात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. पंजाबमधील काँग्रेसचे नेते आप पक्षाशी युती करण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी या भेटीत सांगितले होते. पंजाब काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बाजवा यांच्याप्रमाणेच मत आहे. याबाबत बोलताना पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमिंदरसिंग राजा यांनी “बाजवा यांनी त्यांचे मत हायकमांडला सांगितले आहे. केंद्रीय नेतृत्व त्यांचे मत विचारात घेईल, अशी अपेक्षा आहे,” असे अमरिंदरसिंग राजा म्हणाले.
पंजाबमधील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानेही आप पक्षाशी करावयाच्या युतीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. “पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात युती झाली तरी एकमेकांची मते एकमेकांकडे वळवणे अवघड आहे. आप पक्षातील अनेक नेते हे कधीकाळी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसला आपली मते कायम ठेवायची आहेत. कोणत्याही पक्षाशी युती करण्यापेक्षा आम्हाला पंजाबमध्ये सत्ताधारी होणे जास्त आवडेल. आप पक्षाशी युती केल्यावर काँग्रेस पक्ष संपेल आणि पंजाबमध्ये भाजपाचा उदय होईल,” असे या नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
“पंजाबमध्ये भाजपाचे अस्तित्वच नाही, मग….”
काँग्रेचे आमदा सुखपालसिंग खैरा यांनीदेखील आपसोबत आघाडी करणे योग्य नसल्याचे म्हटले. “भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांची इंडिया ही आघाडी अस्तित्वात आली आहे. मात्र पंजाबमध्ये भाजपाचे तेवढे अस्तित्व नाही. येथे भाजपा एकही जागा जिंकू शकत नाही. त्यामुळे येथे कोणाशी युती करणे कितपत योग्य आहे. सध्या आप पक्षाशी हातमिळवणी करणे हे येथील नेते आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेण्यासारखे आहे. गेल्या १८ महिन्यांपासून भगवंत मान सरकारकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. याच राजकारणाच्या विरोधात आम्ही आहोत,” अशा भावना खैरा यांनी व्यक्त केल्या.
असे असले तरी पंजाबमधील काँग्रेसच्या काही नेत्यांना आप पक्षाशी युती केल्यास काँग्रेसलाही फायदा होईल, असे वाटते. आप पक्षात गेलेले नेते हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. युती झाल्यास हे नेते काँग्रेस पक्षासाठी काम करतील. सध्या काँग्रेसचे जे नेते युतीला पाठिंबा देत नाहीयेत, ते लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, अशा भावना एका नेत्याने व्यक्त केल्या.
“…तर कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही”
“युतीला जे विरोध करत आहेत, ते फक्त राज्य पातळीवरच्या राजकारणाचा विचार करत आहेत. २०२४ साली भाजपाला ते सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा विचार करत नाहीयेत,” अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका नेत्याने व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय पातळीवर झालेल्या युतीच्या निर्णयामुळे भगवंत मान हे कठीण परिस्थितीत सापडले आहेत. असे असले तरी काँग्रेस आणि आप या पक्षाच्या हायकमांडने युती करण्याचा आदेश दिल्यास पंजाबमधील काँग्रेस आणि आपच्या नेत्यांकडे कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही,” अशा भावना आणखी एका नेत्याने व्यक्त केल्या.
दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये आप पक्षाशी करावयाच्या युतीसंदर्भात धुसफूस सुरू असल्यामुळे काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.