२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक बदल करत आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीतही अनेक बदल केले आहेत. आपल्या नव्या कार्यकारिणीत काँग्रेसने अनेक नव्या नेत्यांना स्थान दिले आहे. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हेदखील आहेत. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चरणजितसिंग चन्नी यांचे राजकीय अस्तित्व काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र त्यांना आता थेट काँग्रेसच्या कार्यकारिणीत स्थान मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चन्नी यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश

चरणजितसिंग चन्नी हे काँग्रेसचे पंजाबमधील दलित समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे महत्त्वाचे नेते आहेत. चन्नी यांच्यासह आनंदपूर साहीबचे खासदार मनिष तिवारी तसेच माजी उपमुख्यमंत्री तसेच राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजितसिंग रंधावा या दोन नेत्यांचाही कार्यकारिणीचे कायमस्वरुपी आमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेला आहे.

चन्नी यांचे राजकीय वजन वाढले?

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चन्नी यांची काँग्रेसच्या कार्यकारिणीत सदस्यरुपी स्थान देण्यात आले आहे. या निवडीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असला तरी काँग्रेस हायकमांडचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे, असे आता म्हटले जात आहे. कार्यकारिणीत समावेश झाल्यामुळे चन्नी यांचे पंजाब तसेच राष्ट्रीय पातळीवर वजन वाढणार आहे. याबाबत पंजाबमधील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेस नेतृत्वाच्या नजरेत चन्नी यांचे महत्त्व कमी झाले आहे, असा दावा केला जात होता. मात्र या निवडीमुळे चन्नी यांचे पक्षातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे,” अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली.

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव

चन्नी हे पंजाबमध्ये काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. याच बाबीचा विचार करून त्यांच्याकडे काँग्रेसने मुख्यमंत्रीपद सोपवले होते. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चन्नी हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. पंजाबमध्ये दलितांचे प्रमाण लक्षणीय आहे. याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या विधानसभा निवडणुकीत चन्नी यांनी धडाडीने प्रचार केला होता. या काळात चन्नी बकरीचे दूध काढताना, आपला ताफा मध्येच थांबवून सामान्य लोकांशी बातचित करताना, भांगडा डान्स करताना, फुटबॉल खेळताना दिसत होते. तसेच त्यांनी या निवडणुकीत वीजबील कमी करण्याचे, इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे, वाळू आणि खडीचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत त्यांनी छामकूर साहीब आणि बहादुरपूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचा फक्त १८ जागांवर विजय झाला होता. २०१७ साली काँग्रेसला एकूण ७७ जागा मिळाल्या होत्या.

सात महिने होते परदेशात

ही निवडणूक पार पडल्यानंतर चन्नी लगेच अमेरिका आणि कॅनडात गेले. तेथे ते साधारण ७ महिने राहिले. पीएचडीवर काम करण्यासाठी ते तेथे गेलो होते, असे म्हटले जाते. दरम्यान ते २०२२ सालाच्या डिसेंबर महिन्यात भारतात परतले होते. त्यांना या वर्षाच्या मे महिन्यात पीएचडी मिळाली.

भारतात परतताच दिल्लीतील नेत्यांची भेट

भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. भारतात परतल्यानंतर ते पंजाबमध्ये विशेष चर्चेत नव्हते. मात्र जानेवारीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत त्यांचे अस्तित्व ठळकपणे दिसले होते.

पंजाबमधील स्थिती कशी सांभाळणार?

पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावर विरोधक एकत्र आले आहेत. या आघाडीला त्यांनी इंडिया असे नाव दिले आहे. या आघाडीत आम आदमी पार्टी तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांचा समावेश आहे. पंजाबमध्ये मात्र आप पक्षाशी युती करू नये अशी तेथील काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत चन्नी काय भूमिका पार पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चन्नी यांची चौकशी

दरम्यान, चरणजितसिंग चन्नी यांची बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरू आहे. चन्नी मुख्यमंत्री असताना गोव्यातील पंजाबच्या मालकीची जमीन भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप केला जातो. याचीही चौकशी सध्या सुरू आहे. असे असताना राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाल्यामुळे चन्नी यांना बळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात चन्नी काय भूमिका पार पाडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab former charanjit singh channi included in congress national working committee prd