पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार करताना संबंधित ठिकाणाशी अथवा समुदायाशी आपली किती सलगी आहे, हे दाखवून देण्यासाठी त्यांच्याशी आपले रक्ताचे नाते असल्याचा दावा बरेचदा करतात. त्यांनी हा दावा अगदी मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्याबाबतीतही केला आहे. बरेचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अशा वक्तव्यावरून समाजमाध्यमांवर टीकाही केली जाते. विरोधकही त्यांच्यावर या मुद्द्यावरून तोंडसुख घेताना दिसतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांबरोबर आपले नाते जोडण्यासाठी गुरु गोविंद सिंह यांच्या ‘पंज प्यारें’बरोबर (पाच शीख योद्धा) आपले रक्ताचे नाते असल्याचा वक्तव्य केल्याचा दावा केला जातो आहे. शनिवारी (२६) पटियालामध्ये एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केले असल्याचे म्हटले जात आहे. आपले पंजाबबरोबर रक्ताचे नाते आहे. ‘पंज प्यारें’पैकी (पाच शीख योद्धा) एक योद्धा मूळचे गुजरातमधील द्वारकेचे रहिवासी होते, असे ते म्हणाले.
मोहकम सिंग पंतप्रधान मोदींचे काका असल्याचा दावा किती खरा किती खोटा?
मोहकम सिंग आपले काका असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले असल्याचा दावा एका व्हिडीओवरून केला जात आहे. त्यावरुन मोठा वादही होतो आहे. पंतप्रधान मोदींचे हे विधान चुकीचे असल्याचे दावा त्यांच्या विरोधकांनी केला आहे. त्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी असे म्हणताना दिसतात की, मी पंतप्रधान असण्याची गोष्ट सोडून द्या. माझे तुमच्याशी रक्ताचे नाते आहे. गुरु गोविंदजींच्या ‘पंज प्यारें’पैकी एक माझे काका होते. ते द्वारकामध्ये रहायचे.” मात्र, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी असे विधान केलेले नाही. ‘पंज प्यारे’ च्या सदस्यांपैकी एक सदस्य गुजरातमधील द्वारकेचे होते, असे विधान त्यांनी पंजाबमधील प्रचारसभेत नक्कीच केले आहे. मात्र, मोदींनी त्यांना आपले काका म्हटलेले नाही. परंतु, ते मूळचे गुजरातचे असल्याने त्यांना रक्ताचे नातेवाईक असे संबोधले आहे.
हेही वाचा : “१३० कोटी लोकांना सरकारी नोकरी देणे शक्य नाही”; अमित शाह यांनी ही स्पष्टोक्ती का दिली?
कोण होते ‘पंज प्यारे’?
द्वारका येथील तीरथ चंद आणि देवीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या मोहकम चंद यांचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. गुरु गोविंद सिंग यांनी त्यांचे नाव भाई मोहकम सिंग असे ठेवले. प्रख्यात इतिहासकार आणि पंजाब विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. जी. एस. ढिलाँ यांच्या मते, मोहकम सिंग हे खालच्या जातीतले होते. गुरु गोविंद सिंग यांच्या शिकवणुकीच्या प्रभावाने आकर्षित होऊन ते पंजाबमध्ये आले. जातव्यवस्थेवरील नाराजी व्यक्त करत ते गुरु गोविंद सिंगांकडे आले होते. त्यानंतर ते आनंदपूर साहिबमध्ये गुरू गोविंद सिंग यांच्यासमवेत राहू लागले.
मोहकम सिंग यांचा ‘पंज प्यारें’मध्ये समावेश कसा झाला?
प्राध्यापक डॉ. जी. एस. ढिलाँ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भाई मोहकम सिंग १६८५ मध्ये आनंदपूर साहिब येथे आले. तिथे त्यांनी लवकरच मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. त्यातील तज्ज्ञ झाल्यानंतर ते गुरु गोविंद सिंग यांच्या सैन्याला प्रशिक्षण देऊ लागले. १६९९ मध्ये, गुरु गोविंद सिंग यांनी आनंदपूर साहिब येथे धर्माचे संरक्षण करण्यासाठी मरायलाही तयार असणाऱ्या पाच जणांची निवड केली. हे ‘पंज प्यारे’ शिखांच्या पाच ‘क-कारां’चे पालन करणारे होते. केश, कंघा, कडा, कच्छा आणि कृपाण हे शिखांचे पाच क-कार म्हणून ओळखले जातात. खालसा शिखांनी यांचे पालन करणे बंधनकारक असते.”
पुढे डॉ. ढिलाँ म्हणाले की, “एकीकडे केसांचे मुंडण करण्याची प्रथा पाळणाऱ्या उच्च जातीच्या लोकांनी लांब केस ठेवण्यास नकार दिला, तर गोविंद सिंगांच्या या पाच प्रिय व्यक्तींनी आपले शीर कापून देण्याचीही तयारी दर्शवली. त्यानंतर गुरु गोविंद सिंग यांनी त्यातील पहिल्या प्रिय व्यक्तीला एका तंबूत नेले. तिथे आधीपासूनच एक बकरी होती. गुरु गोविंद सिंग रक्ताने माखलेला चाकू घेऊन बाहेर आले. ते पाहून इतर चार जणांनीही आपले शीर अर्पण करण्याची तयारी दर्शवली. गुरु गोविंद सिंग एकेकाला तंबूत घेऊन गेले. या पाच जणांनीही आपल्या प्राणांची जराही पर्वा न करता हे धारिष्ट्य दाखवले म्हणून गुरु गोविंद सिंग यांनी त्यांचे नाव ‘पंज प्यारे’ असे ठेवले. भाई मोहकम सिंग हे आपले मस्तक अर्पण करणारे चौथे प्रिय व्यक्ती होते.
हेही वाचा : कंगना रणौतच्या मतदारसंघात लूण लोटा प्रथेची चर्चा; देवाची भीती दाखवून केला जातोय प्रचार
‘पंज प्यारें’पैकी इतर चार जण कोण होते?
गुरु गोविंद सिंग यांच्या जवळच्या पाच प्रिय व्यक्तींना पंज प्यारे म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये मोहकम सिंग यांच्याशिवाय लाहोरचे भाई दया सिंग, हस्तिनापूरचे भाई धरम सिंग, जगन्नाथ पुरीचे भाई हिम्मत सिंग आणि बिदरचे भाई साहिब सिंग यांचा समावेश होता. ‘पंज प्यारे’ शीख लोकांसाठी अत्यंत आदरणीय आहेत. त्यांच्याकडे दृढता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. १७०५ साली चमकौरच्या युद्धात भाई मोहकम सिंग शहीद झाले होते.