पंजाबमध्ये आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने करण्यात येत आहे. शहरी हिंदूंचा पक्ष, अशी असलेली आपली प्रतिमा मोडीत काढण्यासाठी या पक्षाकडून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र, भाजपाच्या अलीकडच्या काही कृती-कार्यक्रमांमुळे शिरोमणी अकाली दल आणि शिखांच्या धार्मिक संस्थांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. या धार्मिक संस्थांमध्येही शिरोमणी अकाली दलाचा प्रभाव अधिक आहे. हा पक्ष याआधी भाजपाबरोबर एनडीएमध्ये होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक हजारहून अधिक शीख नेत्यांनी गेल्या शनिवारी (२७ एप्रिल) भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या (DSGMC) सहा आजी आणि एका माजी सदस्याचाही समावेश आहे. या साऱ्या घटनाक्रमानंतर गुरुद्वारा व्यवस्थापनावर देखरेख करणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडून (SGPC) तातडीने आक्षेप घेण्यात आला आहे.

हेही वाचा : राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?

भाजपाकडून शिखांच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) याबाबत असे म्हटले आहे की, भाजपा शिखांच्या धार्मिक घडामोडींमध्ये हस्तक्षेप निर्माण करीत आहे. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केलेल्या दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या विद्यमान सदस्यांनी तातडीने आपापल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. SGPC चे प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांनी गेल्या शनिवारी असे म्हटले आहे, “भाजपाला शिखांच्या धार्मिक घडामोडींमध्ये हस्तक्षेप करायचा आहे; मात्र शीख समुदाय तो अजिबात सहन करणार नाही.”

पुढे धामी असे म्हणाले, “धार्मिक भावना आणि परंपरांचा आदर करतील, असा विश्वास ठेवूनच शीख समुदायाकडून या सदस्यांची मॅनेजमेंट कमिटीवर निवड केली जाते. मात्र, जेव्हा हे सदस्य शीखविरोधी विचारधारा असलेल्या पक्षामध्ये प्रवेश करतात, तेव्हा शीख समाजाच्या भावना दुखावल्या जाणे स्वाभाविकच आहे.”

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यासाठीच इतक्या मोठ्या प्रमाणावर शीख नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला गेला आहे. दिल्लीमधील पश्चिम दिल्ली, ईशान्य दिल्ली व चांदणी चौक मतदारसंघामध्ये शीख समुदायाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळेच इंडिया आघाडीला शह देण्यासाठी ही राजकीय चाल खेळली जात असल्याचे म्हटले जात आहे.

शेतकरी आंदोलनाचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता

तसेच या निवडणुकीमध्ये पंजाब आणि हरयाणा राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांवरून केलेल्या आंदोलनाचा फटकाही भाजपाला बसण्याची शक्यता अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळातील हा रोष थोडा कमी व्हावा म्हणून शीख समुदायाला आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केल जात आहे. एकेकाळी दीर्घकाळ युतीत असलेले शिरोमणी अकाली दल आणि भाजपा सध्या मित्रपक्ष राहिलेले नाहीत. त्याचाही फटका भाजपाला पंजाबमध्ये बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासकरून ग्रामीण भागातील मते मिळविण्यासाठी ही युती पुन्हा कार्यान्वित होण्याची अधिक गरज आहे.

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी मंगळवारी (३० एप्रिल) मॅनेजमेंट कमिटीतील सदस्यांच्या भाजपा पक्षप्रवेशावर टीका केली आहे. ते म्हणाले, “दिल्ली, हरयाणा वा तख्त साहिबानमधील शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीमध्ये अधिकाधिक हस्तक्षेप निर्माण करण्याचा प्रयत्न करून भाजपा शिखांच्या धार्मिक संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. या पक्षाकडून ज्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत, त्या शीख समुदायाच्या लक्षात येत आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबी आणि शीख समुदायातील लोक भाजपाला नक्कीच पूर्णपणे नाकारतील, अशी मला खात्री आहे.”

गेल्या फेब्रुवारीमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी महाराष्ट्र सरकारवरही आगपाखड केली होती. कारण- महाराष्ट्र सरकारने श्री हुजूर साहिब मॅनेजमेंट बोर्डाची स्थापना केली होती. स्वातंत्र्यानंतर शीख समुदायाला काही वचने देण्यात आली होती. त्या वचनांपैकी एक वचन म्हणजे SGPC च्या दोन-तृतीयांश बहुमताची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय केंद्र सरकार शिखांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. सुखबीर सिंग बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या वचनाचीच आठवण करून दिली आहे.

शिरोमणी अकाली दल आणि भाजपामध्ये जुंपली

DSGMC चे अध्यक्ष परमजीत सिंग सारणा यांनी म्हटले, “पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शीख नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे भाजपाला कोणताही फायदा होणार नाही. जर अशी कृती करून आपण शीख समुदायाला आपलेसे करू शकू, असे त्यांना वाटत असेल, तर ते मोठी चूक करीत आहेत. पंजाबमधील मतदार जसे त्यांच्यावर संतापलेले आहेत; तसेच पंजाबबाहेरचे मतदारही संतापलेले आहेत.”

दुसरीकडे, भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरजीत सिंग ग्रेवाल यांनी धामी यांच्या शिरोमणी अकाली दलाशी असलेल्या संबंधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “धामी यांचे शिरोमणी अकाली दलाशी काय संबंध आहेत, याचा आधी त्यांनी खुलासा करायला हवा,” अशी टीका ग्रेवाल यांनी केली आहे.

हेही वाचा : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या नातवासाठी देवेगौडांनी सोडला होता मतदारसंघ; कुटुंबात राजकीय दुफळी

पुढे त्यांनी म्हटले आहे की, DSGMC च्या सदस्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्याचा कोणताही अधिकार धामी यांना नाही. “काँग्रेसमध्ये जाणाऱ्या शिखांबाबत धामी यांनी कसलीही हरकत घेतली नाही. याच काँग्रेस पक्षावर १९८४ च्या शीख दंगलींचा आरोप आहे. मग, भाजपामध्ये जाणाऱ्या शिखांना ते धमकी का देत आहेत? शिखांनी कोणत्या पक्षात जावे, याबाबत कसलीही बंधने खालसा पंथाने घालून दिलेली नाहीत,” असेही ते म्हणाले.

मात्र, शेतकरी संघटनांकडून ग्रामीण भागात भाजपाविरोधी वातावरण आहे. याच संतापामुळे बऱ्याच गावांमध्ये भाजपाच्या नेत्यांना आपल्या प्रचाराचा मार्गही बदलावा लागला आहे. या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून भाजपा छोटे छोटे अनेक उपाय राबवीत आहे. तळागाळामध्ये जाऊन प्रचार करणे, गाव पातळीवर समित्या तयार करणे, तसेच अधिकाधिक व्यक्तींबरोबर ‘चाय पे चर्चा’ करण्याचे आदेशही बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. अशा गोष्टींच्या माध्यमातून ते लोकांचा संताप शमविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab sikh shiromani akali dal bjp interference in sikh farmers protest vsh
Show comments