लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना इंडिया आघाडीच्या पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. उलट आता तो वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांनी सर्व १३ जागांसाठी उमेदवारही जाहीर केले आहेत. दरम्यान, आता काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पंजाब राज्य काँग्रेसने स्क्रीनिंग समितीकडे सर्व १३ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिफारस केलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत. सोमवारी चंदिगड येथील काँग्रेस भवनामध्ये स्क्रीनिंग समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पंजाबचे प्रभारी तथा काँग्रेसचे सरचिटणीस देवेंद्र यादव, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वॉरिंग, काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा हेदेखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब काँग्रेसने शिफारस केलेल्या नावांमध्ये सहा विद्यमान खासदारांचाही समावेश आहे.

हेही वाचा – पहाडी नेत्या शहनाज गनई यांचा भाजपात प्रवेश; लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजकीय समीकरणं बदलणार?

या संदर्भात पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वॉरिंग ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले, ”आम्ही स्क्रीनिंग समितीकडे उमेदवारांच्या नावांची शिफारस केली आहे. आणखी काही नावांची शिफारस करायची असल्यास, त्याबाबत एक ते दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. तसेच ती नावे पुन्हा स्क्रीनिंग समितीकडे पाठविण्यात येतील. त्यानंतरच उमेदवारांच्या यादीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.”

त्याशिवाय काँग्रेसकडून सर्वच समाजांतील उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्यात येईल, अशी माहितीही काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. तसेच यापूर्वी १ फेब्रुवारी रोजीही राज्य काँग्रेस आणि स्क्रीनिंग समिती यांच्यात उमेदवारांच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला अमरिंदर सिंग राजा वॉरिंग, बाजवा, माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी व काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूदेखील उपस्थित होते, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युतीची चर्चा सुरू नसल्याचे संकेत दिले. “इंडिया आघाडी ही देश पातळीवर तयार करण्यात आली आहे; केवळ पंजाबसाठी नव्हे”, असे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पंजाबसह चंदिगड लोकसभेच्या जागेसाठीही काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा – कधी भाजपा, कधी समजावादी पक्ष, तर कधी काँग्रेसशी युती; राष्ट्रीय लोक दल पक्षाचा राजकीय इतिहास काय? वाचा…

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीला धक्का देत, आम आदमी पक्षाने पंजाब आणि चंदिगडमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते. या जागांसाठी त्यांनी उमेदवारांची यादीही जाहीर केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पंजाबमध्ये आठ जागांवर विजय मिळवला होता; तर चंदिगडची जागा भाजपाने जिंकली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab state congress recommended names for loksabha seats to aicc screening committee spb