गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मागणी फेटाळत सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयाविरोधात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याआधीच राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणारे भाजपाचे आमदार पूर्णेश मोद यांनी कॅव्हेट दाखल केले आहे. राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यास माझी बाजू जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी या कॅव्हेटमार्फत करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्णेश मोदी यांनी दाखल केले कॅव्हेट

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील कोलार येथे ‘सर्वच चोरांचे नाव मोदी कसे असते?’ असे विधान केले होते. याच विधानावर आक्षेप घेत पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात सत्र न्यायालय, गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले होते. तसेच या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.

राहुल गांधी यांची याचिका फेटाळली

राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ‘मला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी,’ अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयाला केली होती. मात्र राहुल गांधी यांची ही मागणी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानंतर राहुल गांधी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

७ जुलै रोजी दाखल केले कॅव्हेट

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळानुसार गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची मागणी फेटाळल्यानंतर पूर्णेश मोदी यांनी ७ जुलै रोजी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागितल्यास माझी बाजू सर्वोच्च न्यायालयाने जाणून घ्यावी, अशी मागणी या कॅव्हेटच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purnesh modi file caveat in supreme court against rahul gandhi in defamation case prd