नागपूर: वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री देणाऱ्या व अनेक वर्ष मंत्रिपद भूषवणाऱ्या पुसदचे नाईक घराणे मागच्या पाच वर्षांत मंत्रिपदापासून दूर होते. या घराण्याची राजकीय परंपरा पुढे नेणारे इंद्रनील नाईक सलग दुसऱ्यांदा पुसदमधून विजयी झाले आहेत. त्यांना मंत्री करून अजित पवार हे नाईक घराण्याची खंडित झालेली मंत्रिपदाची पंरपरा पुन्हा सुरू करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील अनेक बड्या राजकीय घराण्यांपैकी विदर्भातील पुसदचे नाईक घराणे एक आहे. या घराण्यातील वसंतराव नाईक हे तब्बल ११ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून नाईक यांची ओळख होती. त्यामुळेच चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यावर त्यांचा वारसदार म्हणून वसंतराव नाईक यांची निवड केली होती. राज्यातील कृषिक्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जातात.

हेही वाचा – विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?

चव्हाण ते नाईक हे सत्ताहस्तांतरण पुन्हा ९१ च्या दशकात घडले. त्यावेळी चव्हाण यांचे मानस पुत्र शरद पवार मुख्यमंत्रिपदी होते व तर वसंतराव नाईकांची जागा त्यांच्याच घराण्यातील दुसरी पिढी सुधाकरराव नाईक यांनी घेतली होती. शरद पवार केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे सुधाकरराव नाईक यांच्याकडे सोपवली होती. १९९१ – १९९३ असे तीन वर्षे नाईक मुख्यमंत्री होते. मधल्या काळात नाईक यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद झाले. पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, नाईक घराण्याने पवार यांची साथ दिली. राज्यात आघाडीची सत्ता आल्यावर नाईक घराण्यातील मनोहर नाईक एका दशकाहून अधिक काळ मंत्री होते. २०१९ च्या निवडणुकीत या घराण्यातील नवी पिढी इंद्रनील नाईक यांच्या रुपात राजकारणात आली. ते पुसद मतदारसंघातून विजयी झाले.

हेही वाचा – Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?

२०१९ ते २०२२ या काळात महाविकास आघाडीचे सरकार होते. पण त्यात राष्ट्रवादीकडून इंद्रनील यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यांनीही त्यांना मंत्री केले नाही. २०२४ मध्ये ते पुन्हा पुसदमधून विजयी झाले. यावेळी त्यांना मंत्रिपदाची आस आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना ही संधी मिळू शकते, असे नाईक यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तसे झाल्यास पाच वर्षांपासून खंडित झालेली नाईक घराण्याची मंत्रिपदाची परंपरा नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pusad naik family vasantrao naik sudhakarrao naik indranil naik minister post tradition ajit pawar group print politics news ssb