अलिबाग- विधान परिषद निवडणूकीत झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे दुःख मलाही आहे. पण मी विधान परिषदेवर लवकरच पुन्हा निवडून येईन, असा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पाटील यांनी अलिबाग शेतकरी भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुभाष पाटील, सुरेश खैरे, चित्रलेखा पाटील यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. विधान परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडी कडून दोनच उमेदवार देण्याचे ठरले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी तिसरा उमेदवार उभा केला. त्यामुळे आपली अडचण झाली. काँग्रेसनेही त्यांच्याकडे असलेली अधिकची मते दोन्ही उमेदवारांना विभागातून दिली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असते.
हेही वाचा >>> हातकणंगल्यात शिंदे गटाला मदत करणारी अदृश्य शक्ती कोणती ?
हितेंद्र ठाकूर यांनी शेवटच्या क्षणी त्यांनी मला मते दिली नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्याचवेळी विधान परिषद निवडणूकीत आमदारांची मते २५ कोटींना विकत घेतली गेली असा दावाही त्यांनी केला. या निवडणूकीत शरद पवार यांनी मनापासून सहकार्य केले. ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहीले त्यांनी केलेली मदत मी विसरू शकणार नाही. ज्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असो अथवा इतर माध्यमातून करोडो रुपयांची मदत केली त्यांनी फसवल्याची खंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. झालेल्या चुका बाजूला ठेऊन आता पुढे जायचे आहे. नव्याने पक्षाची बांधणी करायची आहे. विधानसभेची तयारी करावी लागणार आहे. देशात छोट्या पक्षांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात चार आमदार असलेल्यांना महत्व वाढणार आहे, त्या दृष्टीने आपल्या पक्षाची तयारी असली पाहीजे. मित्र पक्षांची मदत होईल पण त्यांचा मदतीवर अवलबूंन न राहता निवडणूकीच्या तयारीला लागा, असा सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.